हवामान खात्याकडून सुधारित अंदाज जाहीर : महाराष्ट्रातही तापमान घसरणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नवीन वर्षात उत्तर भारताला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या नव्या अंदाजानुसार 4 जानेवारीला उत्तर भारतात नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पंजाब आणि हरियाणामध्येही पावसाची शक्यता आहे. तत्पूर्वी 30 डिसेंबरपासून थंडीची तीव्रता वाढली आहे. 1 ते 3 जानेवारी दरम्यान डोंगराळ भागात तुरळक पाऊस आणि हिमवृष्टी अपेक्षित आहे. तसेच पुढील 5 दिवसात महाराष्ट्रातील किमान तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसची घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील 2-3 दिवसात उत्तर-पश्चिम भारत आणि उत्तर-पूर्व राज्यांमध्ये दाट धुके आणि थंड वातावरण निर्माण होणार आहे. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमध्ये थंडीची लाट आली आहे. हवामान खात्याने या राज्यांमध्ये दाट धुक्याचा इशाराही जारी केला आहे. दुसरीकडे, हिमाचल प्रदेशात थंडीची लाट आणि बर्फवृष्टीमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानच्या वेगवेगळ्या ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये सोमवारीच तीव्र थंडीची परिस्थिती पाहायला मिळत होती. येथील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी होते
पुढील तीन दिवसांची स्थिती
31 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर पंजाब, चंदीगड आणि हरियाणामध्ये थंडीची लाट आहे. आसाम आणि मेघालयातही दाट धुके पडेल. पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये 1 जानेवारीला थंडीची लाट येईल. हिमाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये दाट धुके असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पंजाब-हरियाणा आणि राजस्थानमध्ये 2 जानेवारीलाही थंडीची लाट कायम राहणार आहे. वायव्येकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे दाट धुके कमी होईल.
पुढील पाच दिवसात उत्तर प्रदेशात किमान तापमान 4 ते 6 अंश सेल्सिअसने आणि पंजाबमध्ये 3 ते 4 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे. मध्य भारतात पुढील 24 तासात किमान तापमानात कोणताही बदल होणार नसले तरी पुढील 5 दिवसांत तापमानात 3 ते 5 अंश सेल्सिअसची घसरण होण्याची शक्यता आहे. पूर्व भारतातील किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही. येत्या 3 दिवसात 3 ते 4 अंश सेल्सिअसची घसरण अपेक्षित आहे.
हिमाचल, काश्मीरला हिमवृष्टीचा तडाखा
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सतत बर्फवृष्टी होत आहे. हिमाचलमधील 340 रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. चित्कुलमध्ये अडीच फुटांपेक्षा जास्त बर्फ साचला असून त्यामुळे अनेक पर्यटक अडकले आहेत. बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग पांडुकेश्वर-बद्रीनाथ दरम्यान बंद आहे. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह रस्ता अजूनही बंदच आहे. सुमारे 1,800 वाहने अडकली आहेत. गंदरबल, सोनमर्ग, पहलगाम, बारामुल्लासह अनेक ठिकाणी तापमान उणे 10 ते 22 अंशांवर पोहोचले आहे. काश्मीर विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.