Australia vs India Test Series: मेलबर्न कसोटी सामना हातातून गमावल्यावर बरेच प्रश्न उपस्थित झाले. बुमरा भन्नाट मारा करतो आहे, पण त्याला म्हणावी तशी साथ मिळत नाही. काही फलंदाज जम बसल्यावर आपली विकेट बहाल करत आहेत आणि संघाला गरज असताना वारंवार अपयशी ठरत असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना वेगळा न्याय का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मेलबर्नहून सकाळी ११ च्या विमानाने भारतीय संघ सिडनीला येऊन पोहोचला. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीला भारतीय संघ विश्रांती घेणार असल्याचे समजले. मेबलर्न कसोटीनंतर तीनच दिवसात शेवटचा कसोटी सामना होणार आहे. पूर्ण विश्रांती घेऊन मगच एक दिवसाचा सराव करण्याचा विचार संघ व्यवस्थापनाने पक्का केला.
नववर्षाचे स्वागत करा३१ डिसेंबरला खेळाडूंना सिडनी हार्बरच्या नितांत सुंदर परिसरात फिरायचा आणि नवीन वर्षानिमित्त या जागी होणाऱ्या आतषबाजीचा आनंद घेण्याची मुभा देण्यात आली. संघ सिडनी हार्बरला लागूनच्या हयात हॉटेलात राहात असल्याने जगभरातून येणाऱ्या पर्यटकांची कितीही गर्दी असली तरी खास आतषबाजीचा नजारा खेळाडूंना बघता येणार होता.
सिडनी कसोटीत भारतीय संघ काय कामगिरी करणार हा मुद्दा अजून चर्चेला आलेला नाही. २०२४ वर्ष संपत असताना माजी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीला निवड समिती हरवलेली लय शोधायला अजून किती संधी देणार हा विचार मांडताना दिसतात.
रवी शास्त्रीच्या मते विराट कोहलीमध्ये अजून दोन वर्षांचे कसोटी क्रिकेट बाकी आहे आणि तो लवकरच तुफान धावांचा धबधबा त्याच्या बॅटमधून काढेल, असा विश्वास व्यक्त करत आहे. शास्त्री नेहमीच विराट कोहलीची बाजू लावून धरतो, असे बोलले जात आहे. दुसऱ्या बाजूला बरेच माजी खेळाडू एकच सवाल करत आहेत तो म्हणजे नियम सगळ्यांना एक हवा ना?
विराट कोहली कप्तान असताना त्याने कामगिरीत जरा सातत्य नाही दिसल्यावर चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माला ११ जणांच्या संघातून बाहेर बसवले होते याचा दाखला देत आहेत. गरवर नमूद केलेल्या तीन दर्जेदार फलंदाजांना सातत्याचा अभाव म्हणून संघातून बाहेर बसवले जाते, तर तोच नियम विराट कोहलीला लावायला नको का, हा सवाल विचारत आहेत.
कप्तान असताना कोहली असे धाडसी निर्णय बिनदिक्कत घ्यायचा. मला मैत्री किंवा खेळाडूच्या इतिहासातील कामगिरीचा विचार संघाच्या जडणघडणीचा विचार करताना येत नाही. मी नेहमी फक्त संघाच्या भल्याचा विचार करून आणि खेळाडूचा सध्याचा फॉर्म बघून निर्णय घेतो, असे विराट अभिमानाने आणि आत्मविश्वासाने सांगायचा. अजित आगरकरच्या निवड समितीने तसा विचार करायला पाहिजे, असे मत बरेच माजी खेळाडू बोलून दाखवत आहेत.
२०२० पासून विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीला कसे ग्रहण लागले आहे, असे आकडे दाखवतात.
२०२० : डाव : ६. सरासरी : १९.३३. धावा : ११६
२०२१ : डाव : १९. सरासरी : २९.११ धावा : ५३६
२०२२ : डाव : ११. सरासरी : ६.५०. धावा : २६५
२०२३ : डाव : १२. सरासरी : ५५.९१. धावा : ६७१
२०२४ : डाव : ८. सरासरी : ३२.४२. धावा : २२७
याचाच अर्थ कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ चांगलाच घटला असल्याचे निदर्शनास आणून दिले जात आहेत.
सिडनीला होणाऱ्या २०२५ सालच्या नवीन वर्षाच्या कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मा किंवा विराट कोहलीच्या जागेला धक्का बसेल, असे वाटत नसले तरी भविष्यात हे दोन दिग्गज खेळाडू आपली जागा गृहीत धरू शकतील, असे माजी खेळाडूंना वाटत नाही.
अर्थात अजित आगरकरची निवड समिती काय विचार करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.