वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रवर्तन निदेशालयाच्या (ईडी) अनेक अधिकाऱ्यांनी तामिळनाडूमध्ये धाडसत्र चालविले आहे. राज्यातील किमान पाच स्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी या धाडी टाकल्या आहेत. द्रमुकचे खासदार काथीर आनंद यांच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयावरही धाड टाकण्यात आली. याशिवाय चेन्नईतील गांधीनगर, काटपाडी आणि वेल्लोर जिल्ह्यातील काही स्थानांची झडती ईडीकडून घेण्यात आली आहे. या धाडसत्राला शुक्रवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रारंभ करण्यात आला. काथीर आनंद यांच्या काटपाडी येथील निवासस्थानाचीही झडती घेण्यात आली. आनंद यांचे पिता दुराईमुरुगन हे तामिळनाडूचे जलस्रोत मंत्री आहेत. तसेच ते राज्यात सत्ताधारी असणाऱ्या द्रमुक पक्षाचे महासचिवही आहेत. भ्रष्टाचार आणि मनी लाँडरींग या प्रकरणांमध्ये या धाडी टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले गेले.
इंजिनिअरींग महाविद्यालयाची तपासणी
ईडीचे चार अधिकारी आणि कर्मचारीवर्ग यांनी काथीर आनंद यांच्या किंगस्टन इंजिनिअरींग महाविद्यालयावर धाड घातली. ही शिक्षण संस्था काटपाडी येथे आहे. या संस्थेतून अनेक कागदपत्रे ईडीने हस्तगत केल्याची माहिती देण्यात आली. खासदार आनंद यांच्या गांधीनगर येथील आणखी एका घराचीही तपासणी करण्यात आली. येथूनही काही कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, असे ईडीच्s म्हणणे आहे. तथापि, आनंद यांनी काही सापडल्याची बाब फेटाळली आहे.
आरोप कोणता…
द्रमुक खासदार कथीर आनंद यांच्यावर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मतांसाठी पैशाचे अवैध वाटप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्राप्तीकर विभागाने त्यांच्यावर प्रकरणही सादर केले असून एफआयआर सादर करण्यात आला आहे. या संदर्भात ईडीकडून त्यांची निवासस्थाने, कार्यालये आणि शिक्षण संस्थांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत, अशीही माहिती देण्यात आली आहे. दुराईमुरुगन यांनी या धाडीच्या संदर्भात कानावर हात ठेवले आहेत. आपल्याला या धाडींसंदर्भात आणि धाडींमध्ये ईडीच्या हाती काय लागले, यासंबंधात काहीही माहिती नाही, असा पवित्रा त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना घेतला.
श्रीनिवासनही कचाट्यात
द्रमुक पक्षाचे एक महत्वाचे पदाधिकारी पुनचोलाई श्रीनिवासन यांच्याही आस्थापनांवर शुक्रवारीच धाडी टाकण्यात आल्या. श्रीनिवासन हे द्रमुकच्या क्रीडा विकास विभागाचे अधिकारी आहेत. त्यांचाही पैसे देऊन मते विकत घेण्याच्या प्रकरणात हात आहे, असा आरोप आहे. श्रीनिवासन हे खासदार आनंद यांचे निकटवर्तीय मानले जातात. द्रमुकचे ते महत्वाचे संघटक मानले जातात.