बीड : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी वाल्मीक कराड हा पोलिसांनी शरण आला आहे. वाल्मीक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे विरोधक धनंजय मुंडेंवर निशाणा साधताना दिसत आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी गुरुवारी (2 जानेवारी) म्हटले होते की, मी अजून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलाच नाही. मात्र आज त्यांनी नैतिकताच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत किंवा चार्जशीट दाखल होईपर्यंत पदावर राहावं असं मला वाटत नाही, एकतर त्यांनी विना खात्याचे मंत्री राहावे, अशी मागणी केली आहे. तसेच करूणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तुल ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव माहीत असल्याचेही म्हटले आहे. (Suresh Dhas makes serious allegations against Dhananjay Munde mentioning Karuna Munde)
संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस हे सातत्याने आरोप करताना दिसत आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत म्हटले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपास पथकात काही लोकांची बदली वाल्मीक कराड यांनी केली होती, म्हणून आम्ही त्यांची नावे घेतली आहेत. गडचिरोलीतील एकाची बदली करून वाल्मीक कराड यांनी त्या व्यक्तीला बीडला आणले आहे. त्यामुळे गडचिरोलीतून बदली करून आणलेल्याने त्याची स्वामिनिष्ठा दाखवू नये. कारण काही लोक अतिशय संपर्कात आहेत आणि ते पुढे आले आहेत, अशी माहिती धस यांनी दिली.
– Advertisement –
हेही वाचा – Suresh Dhas : आकाला पकडण्याकडे सर्व फोकस; सुरेश धसांचा कोणावर निशाणा?
सुरेश धस म्हणाले की, करूणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तुल ठेवणारी व्यक्ती दुसरी, तिसरी कोणी नसून ती बीड जिल्ह्यातील पोलीस दलातील होती. त्याचे नाव मला माहिती आहे, पण मी ते बाहेर सांगणार आहे. मी एसपींना त्याच्याबद्दल माहिती देईल. कारण पोलीस दलामध्ये असे काही लोक आहे. माझा चार ते पाच जणांवर आक्षेप नाही. मात्र, खालच्या काही पोलीस अधिकाऱ्यांवर माझा आक्षेप आहे. त्यांच्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले आहे. त्यांनी मला अशा सर्व पोलीस अधिकाऱ्यांबद्दल माहिती काढायला सांगितली आहे. मी सर्व माहिती घेऊन त्यांच्याकडे जाणार आहे, असे धस यांनी सांगितले.
– Advertisement –
सुरेश धस म्हणाले की, करूणा मुंडे यांच्या कारमध्ये आकाच्या सांगण्यावरून पिस्तुल ठेवण्यात आले होते. याप्रकरणी करुणा मुंडेंवर गुन्हा दाखल झाला होता आणि काही दिवस त्या जेलमध्ये होत्या. त्यामुळे पोलीस दलात बिंदू नामावली प्रमाणे माहिती घेण्यासाठी मी पत्र दिले आहे. बिंदू नामावलीप्रमाणेच जिल्ह्यात कर्मचारी राहणार अशी मागणीही केली आहे. त्यामुळे मला वाटतं की, नैतिकताच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत किंवा चार्जशीट दाखल होईपर्यंत पदावर राहावं, असं मला वाटत नाही. एकतर त्यांनी विना खात्याचे मंत्री राहावे किंवा अजित पवारांनी त्यांना काही दिवस मंत्री पदापासून बाजूला करावे, असे मला वाटते. ही सर्व जनतेची भावना आहे, असेही सुरेश धस म्हणाले.
हेही वाचा – Jitendra Awhad : संतोष देशमुखांची हत्या इलेक्शन फंडासाठी; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा