टीम इंडियाला मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या चौथ्या कसोटीत पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाला हा सामना जिंकण्याची संधी होती. मात्र गचाळ फिल्डिंगमुळे भारताने हा सामना गमावला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारताला हा सामना अनिर्णितही सोडवता आला असता, मात्र बेजबाबदार बॅटिंग, शॉर्ट सिलेक्शन आणि अनुभवी खेळाडूंचं आऊट ऑफ फॉर्म असणं या 3 बाबी भारताला महागात पडल्या. ऑस्ट्रेलियाने मेलबर्नमध्ये विजय मिळवत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. आता उभयसंघात पाचवा आणि अंतिम सामना हा 3 जानेवारीपासून होणार आहे. टीम इंडियात पराभवानंतर नववर्षातील पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होण्याची दाट शक्यता आहे.
टीम इंडियात पाचव्या सामन्यासाठी 2 बदल होण्याची शक्यता आहे. शुबमन गिल याचं कमबॅक होणार असल्याचं म्हटलं जात आहे. वॉशिंग्टन सुंदर याला चौथ्या सामन्यात शुबमन गिल याच्या जागी संधी देण्यात आली होती. त्यामुळे आता गिल परतल्यास सुंदर किंवा रवींद्र जडेजा या दोघांपैकी एकाला बाहेर बसावं लागू शकतं. अशात जडेजा की सुंदर? दोघांपैकी कुणाला ठेवायचं? हा निर्णय कॅप्टन रोहित आणि कोच गंभीरसाठी आव्हानात्मक असणार आहे.
तसेच गिल तिसऱ्या स्थानी बॅटिंग करतो. अशात गिलच्या कमबॅकनंतर बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल होणार हे निश्चित आहे. त्यामुळे गिलसाठी पुन्हा एकदा कॅप्टन रोहित ओपनिंगला न येता सहाव्या स्थानी येणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असेल.
मोहम्मद सिराजला या मालिकेतील आतापर्यंतच्या चारही सामन्यात संधी देण्यात आली. सिराजने 4 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या. मात्र सिराजला निर्णायक क्षणी विकेट्स घेता आल्या नाहीत. सिराज जसप्रीत बुमराहला चांगली साथ देण्यात कुठेतरी कमी पडला, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे सिराजला शेवटच्या सामन्यात वगळलं जाऊ शकतं. सिराजच्या जागी प्रसिध कृष्णा याला संधी मिळू शकते.
पाचव्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रेव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क आणि ब्यू वेबस्टर.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.