अमेरिकेच्या न्यायालयाने दिला प्रत्यार्पणाचा आदेश
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
26/11 च्या मुंबईवरील हल्ल्यांमध्ये सहभागाप्रकरणी तहव्वूर राणाला भारतात आणले जाणार आहे. अमेरिकेच्या एका न्यायालयाने राणाच्या प्रत्यार्पणाचा आदेश दिला आहे. राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योजक आहे. भारतीय तपास यंत्रणा (एनआयए) 2008 मध्ये लष्कर-ए-तोयबाकडून करण्यात आलेल्या 26/11 च्या हल्ल्यांमध्ये राणाच्या भूमिकेवरून चौकशी करत आहे. भारताने केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनुसार राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. राजनयिक माध्यमांद्वारे राणाला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राणाच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेच्या विरोधात अमेरिकेच्या न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. राणाला भारतात प्रत्यार्पित केले जाऊ शकते असे न्यायालयाने म्हटले आहे. राणावर मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सामील असल्याचा आरोप आहे. राणाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. एनआयएने एक आरोपपत्र देखील दाखल केले आहे.
दहशतवादी हेडलीला मदत
डेव्हिड हेडली हा लष्कर-ए-तोयबाचा सदस्य असल्याची कल्पना राणाला होती. राणाने हेडलीला मदत करत त्याला सुरक्षा प्रदान केली होती. राणा दहशतवादी संघटना आणि त्याच्या सदस्यांचे समर्थन करत होता. हेडलीच्या हल्ल्यांच्या प्लॅनिंगबद्दल राणाला माहीत होते. राणा हा हल्ल्याच्या कटात सामील होता असे अमेरिकेच्या प्रशासनाने न्यायालयासमोर म्हटले होते.
एनआयएकडून आरोपपत्र
हेडलीने अमेरिकेच्या तपास यंत्रणांसोबत केलेल्या करारानुसार त्याला गुन्ह्यांसाठी भारतात प्रत्यार्पित केले जाऊ शकत नाही. परंतु या गुन्ह्यांकरिता त्याला अमेरिकेत दोषी ठरविण्यात आले आहे. एनआयएने दिल्लीच्या एका न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून यात हेडली, राणा, हाफिज सईद, जकी-उर-रहमान, इलियास काश्मिरी, मेजर समीर अली यांचे नाव नमूद आहे. एनआयएनुसार आरोपींनी लष्कर-ए-तोयबा आणि हुजीकरता महत्त्वपूर्ण स्थळांची रेकी करत हल्ल्याचा कट रचला आणि तयारी केली होती. या स्थळांमध्ये मुंबईतील अनेक ठिकाणे सामील आहेत.
हेडलीकडून रेकी
26/11 च्या हल्ल्यानंतर डेव्हिड हेडली 7 मार्च 2009 ते 17 मार्च 2009 पर्यंत भारतात होता. त्याने दिल्ली, पुष्कर, गोवा आणि पुण्यातील चाबाड हाउसची देखील रेकी केली होती. राणाने हेडली आणि अन्य दहशतवाद्यांना रसद, आर्थिक आणि इतर साहाय्य पुरविल्याचा आरोप आहे. राणाचे प्रत्यार्पण करण्यात आल्यास 26/11 च्या हल्ल्यांमागील पूर्ण सत्य समोर येऊ शकते.