2025 मध्ये दमदार रिटर्न्ससाठी 15 म्युच्यूअल फंड्सवर लक्ष ठेवा, तज्ज्ञांनी नेमकं काय म्हटलं?
Marathi January 03, 2025 12:24 AM

म्युच्युअल फंड गुंतवणूक मुंबई : अनेक जण नववर्षाच्या निमित्तानं अनेक संकल्प करत असतात. काही जण चुकीच्या सवयी सोडतात तर काही जण डाएटवर लक्ष देण्याचा निर्णय घेतात. काही जण बचत वाढवण्याचा संकल्प करतात. बचतीचा मार्ग हा वेगानं जाण्याऐवजी योग्य नियोजनानं, दिशेनं आणि छोट्या रकमेपासून सुरु केल्यास चांगली रक्कम उभी राहू शकते. यासाठी म्युच्यूअल फंडमधील गुंतवणुकीची पद्धत  फायदेशीर ठरू शकते. दीर्घकालीन आर्थिक ध्येय पूर्ण करण्यासाठी म्युच्यूअल फंड फायदेशीर ठरतात.

म्युच्यूअल फंडमध्ये 500 रुपयांपासून गुंतवणुकीचा पर्याय

म्युच्यूअल फंडमधील गुंतवणूक ही शेअर बाजारातील अप्रत्यक्ष गुंतवणूक आहे. यामध्ये अनेक गुंतवणूकदारांचा पैसा एकत्र केला जातो. त्यानंतर तो पैसा एकत्रितपणे शेअर मार्केटमध्ये गुंतवला जातो. म्युच्यूअल फंड असेट मॅनेजमेंट कंपन्यांकडून मॅनेज केले जातात. ज्यांच्या गुंतवणुकीच्या अनेक योजना असतात. यामध्ये जोखीम किती आहे ते देखील गुंतवणूकदारांना पाहायला मिळतं. म्युच्यूअल फंडमध्ये जमा होणारी रक्कम वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर, बॉण्ड, मनी मार्केटमध्ये लावले जातात. योग्य म्युच्यूअल फंडची निवड केल्यास जबरदस्त परतावा मिळतो. म्युच्यूअल फंडमध्ये कोणीही गुंतवणूक करु शकतो, यामध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

गुंतवणुकीसाठी 7 वर्षांचा कालावधी निवडा

तज्ज्ञांच्या मते म्युच्यूअल फंडमधील गुंतवणूक 7 वर्षांची असली पाहिजे. लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या कॉम्बिनेशनचा फायदा घेतला पाहिजे. लाईव्ह मिंटसोबत चर्चा करताना ऑप्टिमा मनी मॅनेजर्सचे संस्थापक आणि सीईओ पंकज मठपाल यांनी स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप मधील टॉप 5 म्युच्यूअल फंडची माहिती दिली आहे. ज्याद्वारे तुम्ही फायदा मिळवू शकता.

कोणत्या फंडमधील गुंतवणूक फायदेशीर?

पंकज मठपाल यांच्या मतानुसार आयसीआयसीआय प्रूडेंशियल ब्लूचिप फंड, निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड, एचडीएफसी टॉप 100 फंड, मोतीलाल ओसवाल लार्ज कॅप फंड आणि बजाज फिनसर्व हे लार्ज कॅप फंड प्राधान्यक्रमावर असावेत. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड, एचडीएफसी मिडकॅप ऑपर्च्युनिटीज फंड, व्हाइटओक मिडकॅप फंड, एचएसबीसी मिडकॅप फंड आणि एडलवाइस मिडकॅप फंड  गुंतवणुकीसाठी चांगले आहेत. स्मॉल कॅप कॅटेगरी गुंतवणूकदार मोतीलाल ओसवाल स्मॉल कॅप, बंधन स्मॉल कॅप, टाटा स्मॉल कॅप, एचएसबीसी स्मॉल कॅप आणि महिंद्रा मॅनुलाइफ स्मॉल कॅप या फंड्सचा गुंतवणुकीसाठी विचार करता येऊ शकतो.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार एसआयपीमधील गुंतवणूक निश्चित रिटर्न देते. विभावंगल अनुकूलकारा प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक सिद्धार्थ मौर्य यांनी मिंटला सांगितलं की एसआयपीमधील गुंतवणूक सर्वात चांगली मानली जाते. कारण, बाजारात होणाऱ्या चढ उतारावेळी कमी किमतीवर अधिक यूनिट आणि अधिक किमतीवर कमी यूनिट खरेदी केले जाऊ शकतात. ज्यामुळं गुंतवणुकीवरील खर्च सरासरी होतो.

इतर बातम्या :

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.