बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
Marathi January 03, 2025 02:24 AM

पुणे : राज्यातील परप्रांतीयांचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून गाजत असतानाच, रोहिंग्या मुस्लीम आणि बांगलादेशी चेही (बांग्लादेशी) वास्तव्य मुंबई, ठाण्यासह पुणे जिल्ह्यातही वाढत असल्याचे अनेक घटनांमधून उघडकीस आलं आहे. गैरमार्गाने बांग्लादेशी नागरिक भारतात वास्तव्यास असून गुन्हेगारीशी निगडीत व्यवसाय आणि लहान-सहान धंदे ते करत असल्याचे उघडकीस आलं आहे. आता, पुण्यात नोकरी करणाऱ्या चक्क तीन बांग्लादेशींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. घुसखोरीच्या मार्गाने भारतात वास्तव्यास असणाऱ्या तीन बांग्लादेशींना पुण्यात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तळेगाव एमआयडीसी येथील कंपनीत या तिघांनी बनावट कागदपत्रांच्या साह्याने नोकरीही मिळवली होती. दहशतवाद विरोधी पथकाने कंपनीत छापा टाकून तिघांना अटक केली आहे. हुसेन शेख, मोनिरुल गाझी आणि अमिरुल साना अशी अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशींची नावं आहेत.

पुणे पोलिसांनी अटक केलेले तिघेही बांग्लादेशमधील साथखीरा जिल्हाचे रहिवाशी असून सध्या ते तळेगाव एमआयडीसी येथील नवलाख उंबरे परिसरात वास्तव्यास होते. या नागरिकांकडे भारतीय आधारकार्ड,पॅनकार्ड, ई श्रम कार्ड, पश्चिम बंगालमधील जन्म प्रमाणपत्र आणि ग्राम पंचायतीचा दाखल मिळून आला आहे. त्यामुळे, या बांग्लादेशींना इतक्या सहजपणे एवढी कागदपत्रे कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित होऊन खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर या आरोपींची झाडाझडती घेतली असता, त्यांच्या मोबाईलमध्ये काही बांगलादेशी ओळखपत्र, पासपोर्ट, जन्म दाखलाही आढळून आला आहे. या नागरिकांच्या मोबाईलवरुन बांग्लादेशमध्ये वारंवार संपर्क झाल्याचंही समोर आले आहे.

कागदपत्रे कशी मिळवली, पोलीस तपास सुरू?

बनावट कागदपत्रांच्या आधारे तळेगाव एमआयडीसी परिसरातील श्री निवास या वाहनांच्या स्पेअर पार्टस बनविणाऱ्या कंपनीत त्यांनी नोकरी मिळवली होती. या कंपनीत ते गेल्या आठ महिन्यापासून काम करत होते, तसेच कंपनी परिसरातील खोलीतच राहायला देखील होते. मात्र ते भारतात कसे, कधी अन कुठून आले? तसेच बनावट कागदपत्रे कधी, कुठून आणि कोणामार्फत मिळवली? याचा शोध पिंपरी चिंचवड पोलीस घेत आहेत.

पुण्यात गुन्हेगारीनं डोकं वर काढलं

दरम्यान, पुण्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा गुन्हेगारांनी डोकं वर काढलेला पाहायला मिळत आहे.. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुण्यात दोन खून तर दोन ते तीन ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यावर बोलताना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सज्ज असुन, जे खुनाचे दोन गुन्हे घडले आहेत, त्यातील आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. यापुढे पेट्रोलिंग वाढवून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शहरातील क्राईम रेट कमी करण्यासाठी नक्की प्रयत्न करु असेही अमितेशकुमार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.