पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आमच्या आधी मटण का खाल्लं म्हणत मित्रानेच तरुणाला मारहाण केली आहे. न्यू इयर पार्टीमध्ये मटण खाल्ल्यावरून २ मित्रांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. यानंतर या वादातून एक धक्कादायक कृत्य घडलं आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, क्षुल्लक कारणावरून झालेल्या या वादातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात फावडा घातल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. निगेश म्हेथे हा तरुण या हल्ल्यात जखमी झाला आहे. याप्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
निगेश म्हेत्रे आणि धम्मपाल सोनवणे हे दोघे ही एकमेकांचे मित्र आहेत. ते दोघेही खाजगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. इतकंच नाही तर ते दोघे ही एकाच खोलीत वास्तव्यास आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने ते पार्टी करत होते. यावेळी म्हेत्रे तू आमच्या अगोदर मटण का खातोस या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात सोनवणेने म्हेत्रे याला शिवीगाळ करत फावड्याच्या दांडक्याने त्याला मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला.
या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.