पुणे : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातून दोन संशयित सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना शनिवारी (4 जानेवारी) अटक करण्यात आली. तसेच, त्यांना केज न्यायालयासमोर हजर करत 14 दिवसांची सीआयडी कोठडीही सुनावण्यात आली. दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना, सर्व आरोपींना पुण्यातूनच कशी अटक होते? असा सवाल उपस्थित केला आहे. (Supriya Sule NCP SP on arrest of Sudarshan Ghule and Sudhir Sangle from Pune)
हेही वाचा : Suresh Dhas : “अजितदादा क्या हुआ तेरा वादा?” सुरेश धसांचा सवाल; म्हणाले, “आकाचे आका करलो तयारी, निकले है…”
– Advertisement –
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “बीडमधील हत्येबाबत दिल्लीमध्येही चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने एक अधिकृत, पारदर्शक आणि सत्य निवेदन महाराष्ट्राला देण्याची गरज आहे. उशिरा का होईना आरोपींना अटक झाली आहे. मात्र सरपंच हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातूनच अटक कशी होते?” असा सवाल त्यांनी केला. पालकमंत्री पदाबाबत होणाऱ्या चर्चांवरही भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, “आतापर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये मी पालकमंत्री पदाची एवढी चर्चा कधीही ऐकलेली नाही. खात्याबाबत जेवढी चर्चा होत नाही, तेवढी पालकमंत्री पदाबाबत होत आहे. पालकमंत्री पदाची जबाबदारी द्या आणि कामाला लागा त्याबद्दल एवढी चर्चा का?” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. कारण मी त्यांच्याकडे एक गंभीर राजकारणी आणि प्रशासक म्हणून पाहते.” असे सूचक विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. विशेष म्हणजे खासदार सुळे यांच्यापाठोपाठ मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी देखील आरोपींच्या पुणे कनेक्शनवर बोट ठेवले आहे. “पुण्यात हे आरोपी कोणाच्या संपर्कात होते? त्यांना कोणाकडून रसद पुरवली गेली? कोणी मदत केली? याची माहिती पुढे आणावी,” अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.