Kondhava News: शहरात नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडत आहेत. अशातच कोंढवा भागातील साईनगरमध्ये नायलॉन मांझामुळे दोन महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नायलॉन मांजाला बंदी घालत त्याच्या वापराविरोधात कडक पावले उचलण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
कोंढवा बुद्रुक येथील शांतीनगर सोसायटीतून साईनगरमधील महिला नागरिक ज्योती कद्रे दुचाकीने प्रवास करत असता नायलॉन मांजाने त्यांच्या मानेला मोठी दुखापत झाली. खाजगी रुग्णालयात जाऊन त्यांनी उपचार घेतला. शिवाय, दुचाकीवरील अन्य दोन महिला नायलॉन मांजामुळे जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे शहरातील विविध भागांमध्ये नायलॉन मांजामुळे दुखापतीच्या घटना घडत आहेत. प्रशासन अधिकारी आणि पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अनेकांना दुखापती होत आहेत. या मांजाच्या विक्रीवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे सर्रास विक्री होत असल्याचे दिसत येत आहे.
महाराष्ट्र सरकारने मानव, प्राणी आणि पर्यावरणाच्या सुरक्षेचा हवाला देत पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाच्या धाग्यांचे उत्पादन, विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे. बंदीचे उल्लंघन केल्यास ५ हजार रुपयापर्यंत दंड आणि ३ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेचा समावेशही आहे.
विशेषत: मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडवताना या धाग्याचा वापर केला जातो. झाडांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला अडकलेला या मांजामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यात सर्वाधित फटका पशू-पक्षांना बसतो.
२०१७ पासून हानिकारक नायलॉन मांजाचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र लहान काचेचा लेपित धागा असणारा हा नायलॉन मांजा शहरात सर्रास विकला जात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांत नायलॉन मांजाचे किमान १६ गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. २०२३ मध्ये सर्वाधिक ७ गुन्हे दाखल करण्यात आले असून २०२४ मध्ये चार गुन्हे दाखल केले आहेत. तर पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
गाडीवर जात असताना अचानक मांजाची दोरी येऊन गळ्याभोवती फास बसला. त्यात मी गाडीवर सासूबाईंसह होते. गाडी खाली पडली. त्यानंतर गळ्याभोवती मोठी इजा झाल्याने रुग्णालयात दाखल व्हावे लागले. नायलॉन मांजाच्या वापरावर पोलिस आणि प्रशासनाने कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे.
- ज्योती कद्रे, नागरिक