राजीव तांबे
अगदी पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे, मुलांची चालण्याची गती आणि पालकांची चालण्याची गती वेगवेगळी आहे. मुलासोबत चालताना पालकांनी कृपया आपल्या मुलाच्या गतीशी जुळवून घ्यावे.
ज्यांना आपल्या मुलांच्या गतीशी जुळवून घेता येत नाही किंवा जे मूलकेंद्री विचार करू शकत नाहीत असे पालक आपल्या मुलांना ओढत किंवा खेचत नेत असताना तुम्ही पाहिले असतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, फूटपाथवरून चालताना आपल्या उजवीकडून वाहने जात असतील, तर आपले मूल आपल्या डाव्या बाजूला हवे. अशावेळी पालकांनी आपल्या डाव्या हाताने मुलाचा उजवा हात हलकेच धरायचा आहे. तसेच वाहने डावीकडून जात असतील तर मूल उजवीकडे असावे.
ऊंचीमधील फरकामुळे पालकांना खूप लांबचे दिसत असते तर मुलाला खूप जवळचे दिसते. यात आणखी एक गंमत म्हणजे पालक चालताना रस्ता बघत असतात; पण मुले?
मुले पालकांबरोबर चालताना बाजूची दुकाने, दुकानाच्या शोरुम्स, दुकानात टांगलेल्या वस्तू अत्यंत उत्सुकतेने आणि बारकाईने पाहत असतात. यातील कुठल्या गोष्टी आपण घ्यायच्या आणि कुठल्या गोष्टींसाठी हट्ट करायचा? असे (उच्च) विचार त्यांच्या मनात सुरू असतात. थोडक्यात सांगायचे तर, मुलांचे अशावेळी रस्त्याकडे दुर्लक्ष असते.
त्यामुळे मुलांसोबत चालताना पालकांना रस्ता बदलायचा असेल किंवा पुढे वळण असेल तर त्याची कल्पना पालकांनी मुलाला आधीच द्यावी. नाहीतर ऐनवेळी मुलांची त्रेधातिरपीट उडते आणि अशावेळी पालकांचा फ्यूज उडण्याची अधिक शक्यता असते (अर्थातच काही सन्माननीय अपवाद वगळून)
पालक नेहमीच्या, सरावाच्या रस्त्याने न जाता एकदम वेगळ्या रस्त्याने किंवा शॉर्टकटने जाऊ लागले, की मुले जुन्या रस्त्याचा आग्रह धरतात, हट्ट करतात. अशावेळी पालकांनी न चिडता मुलाचे ‘बोलणे पूर्ण ऐकून घ्यावे’ (ऐकावे असे नव्हे) आणि नंतर या नवीन रस्त्यावर कुठल्या गमती आहेत, कुठली दुकाने आहेत याविषयी बोलायला आणि दाखवायला सुरुवात करावी.
तसेच तुला यातले कुठले दुकान जास्त आवडले? का आवडले? असे प्रश्न विचारावेत. यामुळे मुलाचे त्याच्या हट्टाकडे दुर्लक्ष होऊन ते वेगळा विचार करू लागते. किंवा कधीतरी त्याचे म्हणणे मान्य करुन ‘जुन्या रस्त्यानेच’ जावे.
चालताना मुले पालकांशी बोलताना एकतर वर तोंड करून बोलतात किंवा इकडे तिकडे पाहत बोलत असतात. यामुळे ती चालताना कधीतरी अडखळतात किंवा कुणावर तरी आदळतात. अशावेळी पालकांनी मुलांना दूषणे देऊ नयेत. (‘नीट समोर बघून चाल.
तुझी बडबड बंद करशील का? लक्ष कुठाय? आता पुन्हा धडपडलास तर माझ्याशी गाठ आहे...’ असे बोलल्याने मुलांचा आत्मसन्मान दुखावला जातोच; पण मुले अधिक व्यथित होतात.) त्यांना सांभाळून घ्यावे. अतिशय मृदू आवाजात आणि मुलाच्या पाठीवर हात ठेवून त्याला समजून सांगावे.
चालताना वळण आले, की ‘चला आता उजवीकडे वळूया, डावीकडे वळूया’ असे मुद्दामहून मुलाला सांगावे. यामुळे उजवे, डावे, सरळ, तिरके अशा विविध संकल्पना मुलांना नकळत स्पष्ट होता आणि मग मुले ही त्याचा व्यवहारात उपयोग करतात.
‘आपल्या लहान मुलाबरोबर आनंदाने चालणारे पालक वृद्ध होतात, तेव्हा तीच मुले आपल्या वृद्ध पालकांचे आनंदाने पालक होतात’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकलीच असेल.