सोनाली कुलकर्णी
आई ही आपल्या सर्वांत जवळची व्यक्ती असते. आपल्याला समज येते, तेव्हा आपणही आपल्या आईकडे बघायला लागतो. खरंतर आपल्याला आपली आई वयाच्या तिशीनंतर समजायला लागते. कारण तोपर्यंत आपण शिक्षण, करिअर आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यामध्ये व्यग्र असतो. मला माझ्या आईला समजून घेताना, तिला माणूस म्हणून बघताना खूप शिकायला मिळालं. प्रत्येकाच्या आयुष्यात खूप गोष्टी घडत असतात.
काही अडचणी निर्माण होत असतात, काही प्रश्न अचानक उद्भवत असतात, नकळत मानापमानांना सामोरं जावं लागत असतं, अशा प्रत्येक प्रसंगांचा सामना माझ्या आईनं साधेपणानं, सच्चेपणानं केला. प्रत्येकवेळी तिनं तिचा आत्मसन्मान टिकवून या सर्व गोष्टी केल्या. खरंतर या गोष्टींचा विचार करताना मी निरुत्तर होते. तिचा आयुष्याचा प्रवास बघताना खूप विलक्षण वाटतं.
आईमुळेच माझ्या अनेक गोष्टी सुलभ झालेल्या आहेत. माझी आई माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. आम्ही दोघीही एकमेकींशी मोठ्या आनंदानं अन् मनसोक्त हितगुज करत असतो. मी माझं दुसरं पुस्तक ‘सो कूल टेक टू’ तिलाच अर्पण केलं आहे. त्यातील अर्पणपत्रिकेतील माझ्या मनातील भावना तुम्हा सर्वांना भावल्याशिवाय राहणार नाहीत. आईनं आयुष्यात स्वावलंबन आणि आत्मसन्मान या गोष्टींना अजिबात तडा जाऊ दिला नाही.
आमच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात आई वाघिणीसारखी उभी राहिली. कुटुंबाच्या भल्यासाठी तिनं वेळप्रसंगी खुसखुशीत चटण्या बनवून विक्री केली. जेवणाचे डबेही दिले; पण तिनं कोणाकडेही पैसे मागितले नाहीत, त्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. कष्टाची लाज बाळगू नका, असाच सल्ला तिनं आम्हाला दिला. बाबांच्या पाठीशी ती रणरागिणीसारखी खंबीरपणे उभी राहिली. आमच्या कुटुंबातील काही सदस्यांचं भावनिक खच्चीकरण झालं होतं, त्यावेळी ती हिमालयासारखी उभी राहिली, तर कधी मृदूही झाली.
आपला मौल्यवान वेळ, आपण केलेल्या कष्टाचे पैसे आणि भावनेची किंमत, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट माझ्या कुटुंबात वेगळ्या प्रकारे शिकवावी लागली नाही. कारण, आमची आई खंबीर होती आणि तिचं वर्तनही तसंच होतं. या गोष्टी आमच्या मनावर आपोआप बिंबत गेल्या. आपण वेळोवेळी जोडलेली माणसं, हीच आपली श्रीमंती असते ही मौलिक शिकवणही आईमुळेच मिळाली.
मला आईमुळे कित्येक गोष्टी शिकायला मिळाल्या. तिच्यामुळेच मला लिहिण्याची आणि वाचनाची गोडी लागली. पाककलेचीही आवड तिच्यामुळेच लागली. स्वयंपाक बनवताना त्याचं नियोजन किती छान असावं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी आई आहे. सकाळी उठल्यानंतर नाश्त्याची तयारी, नाश्त्यानंतर भाजीची तयारी, डाळ-तांदूळ लवकर भिजत घातले, की पुढची कामं लवकर होतात अशा सवयी हा आईचा हातखंडा आहे. त्यामुळे आईचा स्वयंपाक किती लवकर होत असे, हे आम्हालाही कळत नव्हतं. एखाद्या कार्यक्रमाला किंवा खरेदीसाठी वगैरे बाहेर जायचं असल्यास आई पटकन तयार होत असे. तिनं नेहमी आम्हालाच प्राधान्य दिलं. स्वतःसाठी मात्र फारसा वेळ खर्च केला नाही. घर किती स्वच्छ आणि सुंदर ठेवावं, हेही मी तिच्याकडे पाहूनच शिकले.
नाती किती महत्त्वाची असतात, ती कशी जपावी, फुलवावी आणि त्यामध्ये गोडी कशी निर्माण करावी, या गोष्टी आईनं शिकवल्या. आईसारखाच सुसंवाद साधता यावा, असं मला खूप वाटतं. एखाद्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आणि कोणत्या गोष्टी मनावर घ्यायच्या नाहीत, हे तिच्याकडून शिकायला मिळालं.
कुटुंबातील सर्वांनीच आनंदी असावं, अशी तिची मनोमनी इच्छा असते. आई सकाळी रांगोळी काढते, ती मनाला खूपच भावते. त्यातून आत्मिक समाधान मिळतं. एक प्रसंग मला नेहमीच आठवतो. आमच्याकडे थोडे पैसे कमी होते, त्यावेळी आईनं मोठ्या प्रमाणात कष्ट केले. या गोष्टीची परतफेड आम्ही कुणीच करू शकत नाही. कारण, त्यातूनच आमचं कुटुंब सावरलं. ही गोष्ट आम्हा सर्वांना उभारी देणारी होती.
आमच्या घरात जेवढे कार्यक्रम होत असत, ते आई मोठ्या आनंदानं आणि हसतमुखानं साजरे करत असे; पण तिनं त्याचा कधी बाऊ केला नाही. पाहुणे, नातेवाईक आपल्या घरी येतात, त्यावेळी त्यांचा पाहुणचारही व्यवस्थित व्हायला पाहिजे, यावर आईचा भर असे. कुणीच मदतीला नसताना आईनं या सर्व गोष्टी मोठ्या आनंदाने केल्या. आम्हा तीन भावंडांना फुलांप्रमाणे जपलं अन् वाढवलं. घरातील वडीलधारी माणसं आजारी असल्यास त्यांची सेवा करणं, दवाखान्यात डबे पोचवणं या गोष्टीही वेळोवेळी केल्या.
या प्रवासात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई-बाबांचं सहजीवन. त्यांना एकमेकांबद्दल जो ओलावा वाटतो, जे प्रेम वाटतं, ती आनंददायी बाब आमच्या सर्वांच्या मनामध्ये झिरपत राहते. ज्यावेळी आई बाबांसाठी एखादा छान पदार्थ बनविते, त्यावेळी बाबा दाद देतात, आईला बरं नसल्यास बाबा खंबीरपणे तिच्या पाठीमागे उभी राहतात, तिच्या बाजूनं बोलतात आणि तिची काळजी घेतात, अशा अनेक प्रसंगांमुळे आम्हा सर्वांना भरून येतं. आईबद्दल प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माया या गोष्टी आपोआपच जागृत होतात.
आश्वासक निवांतपणा
आई निवांत असते, त्यावेळी तिचं निवांत असणं माझ्यासाठी खूप आश्वासक असतं. आपण घरी पोचल्यानंतर, आईबरोबर चहा घेणार, ही गोष्ट मनामध्ये आली किंवा तशी आठवण जरी झाली तरी खूप बरं वाटतं. समोरच्या व्यक्तीला आपल्यातील निवांतपणा देऊ करणं, ही गोष्ट सोपी नाही. अशीच शक्ती माझ्यातही यावी, अशी माझी इच्छा आहे. आई समोरच्यांना खूप हसवते. तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि स्मित हास्याची खुमासदार शैली मला खूप भावते. हे सर्व गुण माझ्यात यावेत, असं मला नेहमीच वाटतं.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)