IND vs AUS 5th Test: सिराजने कॉन्स्टास-हेडला धाडलं माघारी, तर बुमराहचा लॅबुशेनला बाद करत आणखी एक भारी विक्रम
esakal January 04, 2025 01:45 PM

Australia vs India 5th Test: भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे. या सामन्यात शनिवारी म्हणजेच सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची (४ जानेवारी) सुरुवात भारतीय संघाने शानदार केली आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह चमकले आहेत.

भारतीय संघ पहिल्या डावात पहिल्याच दिवशी १८५ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया फलंदाजीला उतरले होते. त्यांनी उस्मान ख्वाजाची विकेट पहिल्याच दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर गमावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सलामीवीर सॅम कॉन्स्टासला साथ देण्यासाठी मार्नस लॅबुशेन आला होता.

मात्र त्याला ७ व्या षटकात जसप्रीत बुमराहने यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या हातून झेलबाद करत २ धावांवर माघारी धाडले. यासह बुमराहने एक विक्रमही केला. त्याचा ऑस्ट्रेलियामध्ये एका कसोटी मालिकेतील ही ३२ वी विकेट ठरली.

त्यामुळे बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एका कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांक मिळवला आहे. त्याने बिशन सिंग बेदी यांचा विक्रम मागे टाकला आहे. बिशन सिंग बेदी यांनी १९७७-७८ दौऱ्यात ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेमध्ये ३१ विकेट्स घेतल्या होत्या.

या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भागवत चंद्रशेखर असून त्यांनी १९७७-७८ च्या दौऱ्यातच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत २८ विकेट्स घेतल्या होत्या.

चौथ्या क्रमांकावर इरापल्ली प्रसन्ना आणि कपिल देव संयुक्तरित्या आहेत. प्रसन्ना यांनी १९६७-६८ दौऱ्यात, तर कपिल देव यांनी १९९१-९२ दौऱ्यात ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत प्रत्येकी २५ विकेट्स घेतल्या होत्या.

सिराजचा ऑस्ट्रेलियाला धक्का

बुमराहने लॅबुशेनला बाद केल्यानंतर कॉन्स्टासला दुसर्या बाजूने स्टीव्ह स्मिथ चांगली साथ देत होता. कॉन्स्टासने काही चांगले शॉट्सही खेळले. पण त्याला १२ व्या षटकात मोहम्मद सिराजने चूक करण्यास भाग पाडले. त्याचा झेल गलीमध्ये यशस्वी जैस्वालने घेतला. कॉन्स्टास ३८ चेंडूत ३ चौकारांसह २३ धावा करून माघारी परतला.

त्यानंतरही ट्रॅव्हिस हेडने फलंदाजीला आल्या आल्या चौकार ठोकला होता. पण त्यालाही १२ व्या षटकात लगेचच सिराजने केएल राहुलच्या हातून झेलबाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हेड ३ चेंडूत ४ धावांवर बाद केले. त्यामुळे एका क्षणी ऑस्ट्रेलिया ४ बाद ३९ धावा अशा स्थितीत सापडले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.