Manoj Jarange Patil : ‘यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही…’ सुदर्शन घुलेच्या अटकेनंतर जरांगेंची प्रतिक्रिया
GH News January 04, 2025 03:09 PM

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक झाल्याची माहिती आहे. हे दोन मुख्य आरोपी आहेत. या अटकेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आता एक काम सरकारकडून होणं गरजेचं आहे. या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट केली पाहिजे. खंडणीच्या आणि हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. सरकारने यात अजिबात हयगय करु नये. . कारण यामध्ये मोठं रॅकेट आहे” असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. “पुण्यातून सगळ्यांना पकडलं जातय याचा अर्थ सरकार आणि सरकारमधील मंत्र्याच प्रचंड राजकीय पाठबळ आहे. यांना कोण संभाळतय, त्यांना सुद्धा सरकारने अटक करावी” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

“देशमुख बांधवाची क्रूर पद्धतीने हत्या झाली. आरोपीला संभाळण्यात यांना मोठेपणा वाटतो. हे कोण आहेत? यांना आरोपीला भाकरी द्यावीशी वाटते. आरोपीला संभाळतात. त्यांना ऐशोआराम देतात. आरोपीने कोणाच्या तरी लेकाचा, लेकीच्या बापाचा खून केलाय. तुम्ही त्यांना संभाळताय. सरकारने यांना पाठिशी घालू नये. हे रॅकेटच आहे” असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

आता पुण्याच नाव खराब करताय

आरोपी पुण्यात सापडतायत, त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “हा डावच आहे. सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालतायत. इतके दिवस लपून राहतात. सामूहिक कट शिजत आहे. सरकारमधले मंत्री-आमदार यांना शिकवतात. बीडच नाव बदनाम केलं, आता पुण्याच नाव खराब करताय. हे आरोपींना शिकवतायत” असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

यांच्या बापाला थंड होत नाही

हे प्रकरण थंड करुन दाबण्याचा प्रयत्न होतोय का? यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “यांच्या बापाला थंड होत नाही. यांच्या बापाचा बाप आला, तरी आम्ही मॅटर दाबू देणार नाही” “गृहमंत्रालयाला एकच सांगणं आहे की, लपवून ठेवणाऱ्यांना सुद्धा सोडू नका. ते सुद्धा खुनाला जबाबदार आहेत. ज्यांची वाहन वापरली, ते सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. लेकरु गेलं याचं दु:खच नाही. गुन्हेगारांना लपवून ठेवणं ही भूमिका चांगली नाही. यांना धडा शिकवणं गरजेच आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. या प्रकरणात आरोपींचा आकडा 50-60 पर्यंत जाईल असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.