ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पाचवा अंतिम कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येत आहे. पाचव्या सामन्यतील दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दोन्ही दिवशी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. टीम इंडियाला बॉलिंग दरम्यान मोठा झटका लागला जेव्हा कर्णधार जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं. बुमराहला दुसऱ्या दिवशी फक्त 10 ओव्हर टाकल्यानंतर मैदानाबाहेर जावं लागलं. बुमराहच्या दुखापतीवर आवश्यक तपासणी करण्यात आली. त्यानंतर आता बुमराहला नक्की काय झालंय? याबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे.
जसप्रीत बुमराहने आतापर्यंत या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. बुमराहने या मालिकेतील प्रत्येक डावात आपल्या बॉलिंगने छाप सोडली आहे. तसेच निर्णायक क्षणी छोटेखानी खेळी करत टीम इंडियाची लाज राखली. बुमराहने पाचव्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी 10 ओव्हर टाकल्या आणि 1 विकेट घेतली. मात्र त्यानंतर बुमराहला त्रास जाणवत असल्याने मैदानाबाहेर जावं लागलं. त्यानंतर दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा याने बुमराहच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. बुमराहला पाठीत त्रास असून वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याची माहिती प्रसिधने दिली.
दरम्यान बुमराह तिसऱ्या दिवशी खेळणार की नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना लागून आहे. मात्र याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाला या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पाचव्या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक आहे. त्यामुळे बुमराहच्या कमबॅककडे साऱ्यांचं लक्ष आहे.
दरम्यान टीम इंडियाने खेळ संपेपर्यंत 6 विकेट्स गमावून 141 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडे 4 धावांची आघाडी आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे एकूण 145 रन्सची लीड झाली आहे. रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर दोघेही नाबाद आहेत. तर ऋषभ पंत याने 31 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्ससह 61 रन्स केल्या.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.