पुणे - 'मराठेशाहीत फक्त मराठेच नव्हते, तर अठरापगडा जाती धर्मातील लोकांचा सहभाग होता. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे निर्माते जरुर होते, पण त्यांच्या मागे याच हजारो लोकांची ताकद होती. म्हणुनच महाराजांनी परकीयांविरुद्ध लढा उभारला.
शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना, त्यांच्यासमवेतच्या अठरापगड जाती धर्मांमधील शिलेदारांचा स्वराज्य निर्मितीमधील इतिहास पुढे आणण्याची गरज आहे.' असे मत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी व्यक्त केले.
स्नेहल प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि सौरभ कर्डे लिखित "छत्रपती शिवराय आणि स्वराज्य', 'वाघ दरवाजा' आणि 'सरसेनापती हंबीरराव मोहिते' या तीन पुस्तकांचे प्रकाशन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले.
यावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार हेमंत रासने, स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिलीप शेठ, अभिनेते व चित्रपट दिग्दर्शक प्रवीण तरडे, संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीषमहाराज मोरे, शिवसृष्टीचे विश्वस्त विनीत कुबेर, हिंदू युवा प्रबोधिनीचे राजेंद्र बेंद्रे, लेखक कर्डे व स्नेहल प्रकाशनाचे रवींद्र घाटपांडे उपस्थित होते.
सध्याच्या काळात राजकारणात निष्ठा कुठेही दिसत नसल्याची खंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 'सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपार निष्ठा होती. अशा अठरापगड जाती धर्मातील कित्येक लोकांच्या हजारो हातांनी स्वराज्य घडविण्याचे काम केले. म्हणूनच त्यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
प्रवीण तरडे यांनी त्यांचा इतिहास समाजापुढे मांडण्याचे काम केले पाहिजे. सौरभ कर्डे यांच्यासारख्या लेखकांनी देखील शिवाजी महाराजांच्या कालखंडातील प्रकाशझोतात न आलेल्या घटना, प्रसंगांवर लेखन करण्यास प्राधान्य द्यावे.'
मोहोळ म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य पुढे आणण्यात पुणे शहरातील दिग्गजांचे मोठे योगदान आहे. हा वारसा समृद्धपणे पुढे चालविण्याचे काम सौरव कर्डे या युवा लेखकडून होत आहे. तो समाजातील प्रत्येक घटकाशी एकरूप झालेला आहे. त्याने आपल्या वाढदिवसानिमित्त तीन पुस्तके आपल्याला भेट दिली आहेत. समाज, देश व धर्माचा विचार करणारी सौरभ सारखी माणसे जपण्याचे काम समाजाने केले पाहिजे.'
कर्डे यांनी आपल्या 'छत्रपती शिवराय आणि स्वराज्य', 'वाघ दरवाजा' आणि 'सरसेनापती हंबीरराव मोहिते' या तिन्ही पुस्तकांची माहिती दिली. सुटसुटीत व सोपी भाषा ही या पुस्तकांची वैशिष्ट्य असुन कुटुंबातील लहानांपासुन ते मोठ्यांपर्यंत सर्वांना ही पुस्तके वाचण्यासाठी नक्कीच आवडतील, असे असे कर्डे यांनी सांगितले.
...अन् पुन्हा एकदा जुळला भक्ती-शक्तीचा संगम!
पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज शिवेंद्रसिंहराजे भोसले व संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीषमहाराज मोरे हे व्यासपीठावर एकत्र आले. त्यावेळी, शिवेंद्रसिंह राजे यांनी शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा आवर्जुन उल्लेख केला. तसेच शिरीषमहाराज मोरे यांच्या आग्रहास्तव फेटाही परिधान केला.