Santosh Deshmukh Murder Case : फरारी घुले, सांगळेला अटक; आरोपींना १५ दिवसांची 'सीआयडी' कोठडी
esakal January 05, 2025 06:45 AM

बीड/पुणे : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व निर्घृण हत्या प्रकरणातील फरारी, संशयित आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे यांना पकडण्यात बीड पोलिसांना २७ व्या दिवशी यश आले. हत्येच्या दिवशी आरोपींना देशमुख यांचे लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणे (रा. मस्साजोग) यालाही पोलिसांनी अटक केली. या घटनेतील कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे.

घुले, सांगळे व सिद्धार्थ सोनवणे या तिघांना केज न्यायालयाने १५ दिवसांची (ता. १८ ) पोलिस कोठडी सुनावली. सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ रोजी वाहनातून अपहरण करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालीन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे व महेश केदार या सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, यापूर्वी पोलिसांनी जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार व विष्णू चाटे या चौघांना अटक केली असून ते ‘सीआयडी’च्या कोठडीत होती. विष्णू चाटे खंडणी प्रकरणात कोठडीत आहेत.

या खून प्रकरणाच्या तपासासाठी गृह विभागाशी संबंधित गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे.

दरम्यान फरारी असलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांना बीड पोलिसांनी दोनच दिवसांपूर्वी वाँटेड म्हणून जाहीर करून त्यांच्यावर बक्षीसही जाहीर केले होते. पोलिसांनी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघांना पहाटे पुण्यातील बालेवाडी येथून ताब्यात घेतले. नेकनूर पोलिस ठाण्यात त्यांच्या अटकेची कारवाई करून त्यांना केज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. बाळासाहेब कोल्हे यांनी सीआयडीतर्फे आरोपींच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायाधीश पावसरकर यांनी या तिघांनाही १५ दिवसांची कोठडी सुनावली.

सिद्धार्थ सोनवणेने दिली टीप

मस्साजोग येथीलच सिद्धार्थ सोनवणे याने घटनेच्या दिवशी (ता. नऊ डिसेंबर) देशमुख यांचे वाहन कुठून येते आहे? याबाबतच्या लोकेशेनची टीप आरोपींना दिली होती. सोनवणेचाही आता मुख्य आरोपींमध्ये समावेश झाला आहे. देशमुख यांच्या अंत्यविधीलाही तो हजर होता. या घटनेनंतर मस्साजोग ग्रामस्थांनी जे आंदोलन केले त्यातही सोनवणे सहभागी झाला होता. मात्र, खून प्रकरणात सुरवातीला दोन आरोपी पकडले व त्यांचे मोबाईल जप्त केल्याची माहिती मिळाल्यानंतर तो फरारी झाला व कल्याण येथे ट्रॅक्टरवर काम करू लागला.

चौकशीतून धागेदोरे हाती

संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे या तिघांना फरार होण्यास मदत करणाऱ्या कासारी (ता. धारूर) येथील डॉ. संभाजी वायबसे यास शुक्रवारी (ता. तीन) रात्री ‘सीआयडी’ने ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याला साथ देणारी त्याची वकील पत्नीही ‘सीआयडी’च्या ताब्यात आहे. या दांपत्याकडूनच पोलिसांना फरार आरोपींचा शोध घेण्यास मदत झाली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर २०२४ ला अपहरण करून खून करण्यात आला. सुरुवातीला या प्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, प्रतीक घुले व महेश केदार या सहा जणांवर गुन्हा नोंद झाला तर, दुसऱ्या दिवशी विष्णू चाटे याच्यावरही गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी सुरुवातीला जयराम चाटे, प्रतीक घुले व महेश केदार या तिघांना अटक केली होती. मात्र, सुदर्शन घुले, विष्णू चाटे व सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे फरार होते.

नंतर विष्णू चाटेलाही पोलिसांनी अटक केली. घुले, सांगळे व आंधळे या तिघांना फरार होण्यासाठी डॉ. संभाजी वायबसे याने सर्वतोपरी मदत केल्याची माहिती समोर आली आहे. यात त्याला त्याच्या वकील पत्नीचीही साथ मिळाली. त्यामुळे शुक्रवारी (ता. तीन) या दांपत्याला पोलिसांनी नांदेड येथून ताब्यात घेतले. या दोघांच्या चौकशीतून घुले व सांगळे यांचा पुण्यातील ठिकाणाचा पोलिसांना ठाव लागला. रात्रीच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुण्याकडे रवाना झाले. पहाटेच या दोघांना बालेवाडी (पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान वायबसे दांपत्य अद्याप पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी सुरूच आहे.

नेते राज्यपालांना भेटणार

देशमुख यांच्या हत्येप्रकरणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहे. ही भेट ६ जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता नियोजित आहे.

सरपंच देशमुख खून प्रकरण

सरपंच संतोष देशमुख यांच्या बंधूंना धमकावण्यात आले असून यापुढे जर त्यांच्या कुटुंबीयांना धक्का लागला तर मंत्री धनंजय मुंडे यांना रस्त्यावर देखील फिरू देणार नाही. राज्यातील सरकारने तातडीने हत्येतील आरोपींवर ‘मोक्का’सारखी कठोर कारवाई करावी. मराठा समाज शांततेने न्याय मागत आहे.

मनोज जरांगे, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.