मुंबई: मेट्रो फेऱ्या सुरू होण्यासाठी कारशेड बांधले जाण्याची प्रतीक्षा करू नका. जगात कारशेड नसतानाही मेट्रो धावत असल्याची जाणीव करून देत दरवर्षी किमान ५० किलोमीटरचे मेट्रोमार्ग बांधण्याचे उद्दिष्ट ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करण्यासदेखील त्यांनी सांगितले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. मेट्रो सुरू करण्यासाठी कारशेड कधी तयार होतील, याची वाट पाहू नका. जगात कारशेडविना मेट्रो धावण्याचे प्रयोग होत आहेत. त्याचा अभ्यास करा. त्याला तात्पुरत्या पर्यायी व्यवस्था काय आहेत, याचाही आढावा घ्या.
भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत, त्यासाठी कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा. पुढच्या वर्षीपासून ५० किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईल, याबाबत नियोजन करा. यावर्षी किमान २३ किमीचे मेट्रोमार्ग सुरू होतील. ‘मेट्रो-३’मुळे २० ते २५ किलोमीटरची त्यात आणखी भर पडेल, असे फडणवीस म्हणाले. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी सुरू असलेल्या कामांचे सादरीकरण केले.
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर २०२५ अखेरीस पूर्ण करा. तसेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करण्याच्या सूचना फडणवीस यांनी यावेळी दिल्या.