पुणे - सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या जागांमध्ये आता दुप्पट वाढ होण्याची चिन्हे आहेत. विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इन्स्ट्रुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल इंजिनिअरिंग या विद्याशाखांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) पाठविला आहे. लवकरच या वाढीव जागांना मान्यता देण्यात येईल, अशी माहिती सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै यांनी दिली.
विद्यापीठातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ. दयानंद सोनवणे उपस्थित होते. विद्यापीठात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात कृत्रिम बुद्धीमत्ता आणि मशिन लर्निंगमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे.
तसेच, एआय इन सिग्नल प्रोसेसिंग, एआय इन हेल्थकेअर, एआय ॲण्ड रोबोटिक्स, इंटेलिजंट कम्युनिकेशन सिस्टिम, मटेरिअल प्रोसेस टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. तर, एम.एस्सी इन अप्लाईड सायकॉलॉजी (प्रवेश क्षमता ३०) हा बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम देखील सुरू केला जाईल, असे पै यांनी सांगितले.
डॉ. भिरूड म्हणाले,‘‘नामांकित संस्था आणि उद्योग यांच्या सहकार्यातून क्वांटम कॉम्प्युटिंग, मानसशास्त्र, परदेशी भाषा, ऊर्जा व्यवस्थापन, पर्यावरणीय शाश्वतता, सप्लाय चेन मॅनेजमेंट, एंटरप्राईज रिर्सोस प्लॅनिंग, ॲग्रिकल्चर ॲण्ड स्मार्ट फार्मिंग, फायनान्स, अर्थशास्त्र, भारतीय ज्ञान प्रणाली यामध्ये बहुविद्याशाखीय कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार आहेत.’’
अशा असणार शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील ‘बी.टेक’ अभ्यासक्रमाच्या जागा -
अभ्यासक्रम : यापूर्वीच्या जागा : शैक्षणिक वर्ष २०२५-२६मधील जागा
सिव्हिल इंजिनिअरिंग : ७५ : १५०
कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग : १५० : ३००
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग : ७५ : १५०
इन्स्ट्रुमेंटेशन ॲण्ड कंट्रोल इंजिनिअरिंग : ३८ : ६०
चिखलीतील उत्कृष्टता विकास केंद्र फेब्रुवारीत होणार कार्यान्वित
‘चिखलीत २८ एकर परिसरात उत्कृष्टता विकास केंद्र साकारण्यात आले आहे. फेब्रुवारी २०२५ अखेरीस हे केंद्र कार्यान्वित होईल. विद्यार्थ्यांसह उद्योजकांना अत्याधुनिक सुविधा, संशोधन आणि नवोपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने हे केंद्र विकसित केले आहे. या केंद्रासाठी सरकारने १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून आतापर्यंत ६० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे,’ असे पै यांनी सांगितले.
व्यावसायिकांनाही मिळणार ‘पीएच.डी’ करण्याची संधी
व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनाही आता विद्यापीठात ‘पीएच.डी.’ अभ्यासक्रम करण्याची संधी मिळू शकणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विद्यापीठात हा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे व्यावसायिकांही त्यांची कौशल्ये आणि शैक्षणिक पात्रता वाढवण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. याद्वारे संशोधनात उद्योग-शैक्षणिक सहकार्य मजबूत करण्यात येईल, असे डॉ. भिरूड यांनी सांगितले.