BMC Election : अजित पवार गट मुंबई महापालिकेच्या किती जागा लढणार? पक्षातील नेत्याने आकडाच सांगितला
Saam TV January 05, 2025 06:45 AM

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिक निवडणूक कधी होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत्या दोन-तीन महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. अनेक राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार गट देखील निवडणुकीसाठी सक्रिय झाला आहे. या आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाने ६० जागांची मागणी केली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

महानगरपालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईत सक्रिय झाला आहे. आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने घाटकोपरमध्ये बैठक पार पडली. मुंबईचे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वात मुंबई विभागीय वॉर्ड पालक सभा पार पडली.

या सभेला मोठ्या संख्येने अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बहुतांश पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त जागा मुंबईत लढवाव्यात, अशी विनंती केली. यावेळी शिवाजीराव नलावडे यांनी महायुतीमध्ये आम्हाला या अगोदर योग्य उमेदवारी मिळाली नाही. मुंबई मनपा निवडणुकीत आम्हाला ६० जागा हव्याच अथवा आम्ही २२७ जागांची तयार केली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे म्हणाले, 'उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा होत आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. अनेक राजकीय पक्षांनी काम सुरु केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी नारळ फोडला आहे. आमची वॉर्ड पालक संकल्पना राबवत आहोत. कार्यकर्त्यांचा विचार बरोबर आहे. लोकसभेत आम्हाला एकही जागा मिळाली नव्हती. आम्ही युतीचा धर्म पाळला. आम्ही विधानसभेत ६-७ जागा मागितल्या. पण आम्हाला ३ जागा मागितल्या. आमची एक सीट लागली. यावेळेला आम्ही युतीचा धर्म पाळणार. युतीमध्येच निवडणूक लढणार आहे'.

'आम्हाला न्याय दिला नाही तर मुंबईला नेतृत्वात किमान ५०-६० जागा दिल्या नाही, तर आम्ही २२७ ठिकाणी निवडणूक लढवू. आम्हाला व्यवस्थित जागा मिळाल्या नाहीत. तर प्रत्येक वार्डातून आमचा उमेदवार उभा राहील. तिथे आमचा संघर्ष असले. आमची तयारी झाली आहे. बूथ लेव्हलवर तयारी झाली आहे. कार्यकर्त्यांच्या पातळीवर तयारी झाली आहे. आम्ही महायुतीत असेल तेव्हा उपमहापौर करू. तसेच महापौरपदासाठी स्वतंत्र्य लढण्याचीही तयारी आम्ही करतो, असे नलावडे पुढे म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.