रघुनंदन गोखले
आपल्याला पाश्चात्त्यांच्या पुराणातले फिनिक्स पक्ष्याचे उदाहरण माहिती आहेच, की हा पक्षी कसा राखेतून पुन्हा जिवंत झाला. ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचे उदाहरण काही फार वेगळे नाही. गेल्या दोन स्पर्धांमध्ये अक्षरशः शेवटच्या स्थानावर आलेल्या हम्पीने न्यूयॉर्कमधील जागतिक जलदगती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून भारतीय क्रीडारसिकांना आनंदाचा धक्काच दिला. २०१९ साली रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये जिंकलेल्या हम्पीचे हे दुसरे जलदगती जगज्जेतेपद आहे. ते अजिंक्यपद पण लग्नानंतर दोन वर्षे एकही स्पर्धा न खेळलेल्या हम्पीने अचानक पुनरागमन करून मिळवलेले होते. २०२३ साली जागतिक जलदगती अजिंक्यपद स्पर्धेत हम्पी दुसरी आली होती.
खरेतर २०२४ मध्ये सतत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या हम्पीने आता बुद्धिबळाला रामराम करायचा विचार केलेला होता. त्यात न्यूयॉर्कच्या थंडीत तिला त्रास होईल म्हणून उगाच इतक्या दूर जाऊ नये, असेच तिच्या आईचे मत होते. हम्पीला थंडीप्रमाणे जेट लॅगचा पण त्रास होतो. या सर्व अडचणींवर मात करू, या आशेने हम्पी न्यूयॉर्कमध्ये उतरली आणि पहिल्याच फेरीत कझाकस्तानच्या अमीना कैरबेकोवाशी तिचा पराभव झाला.
यानंतर मी काही पहिली येईन असे मला अजिबात वाटत नव्हते,’’ असे हम्पी प्रांजळपणे कबुल करते. त्यात जेट लॅगचे भूत तिच्या मानगुटीवर बसले होते. तिला रात्री एक वाजता जाग येत असे आणि नंतर झोप लागत नसे. तारवटलेल्या डोळ्यांनी पण कणखर मनाने ही बुद्धिबळ साम्राज्ञी एकदा पटावर बसली की सगळे विसरून फक्त जिंकण्यासाठी मन एकाग्र करून खेळत होती. अखेरच्या फेरीत इंडोनेशियाच्या इरीन सुकंदरला काळ्या मोहऱ्यांकडून पराभूत करून हम्पीने आपल्या देशासाठी सुवर्णपदक खेचून आणले.
आपल्या देशासाठी खेळताना सर्वस्व ओतून खेळणे हम्पीसाठी नवीन नाही. हम्पीच्या धमन्यातून रक्त नव्हे तर बर्फ वाहतो असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. बुद्धिबळ शौकिनांना आठवत असेल, ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड २०२० मधील भारत-पोलंड लढत. हजारो भारतीय श्वास रोखून ही लढत इंटरनेटवर बघत होते. कारण जिंकणारा संघ अंतिम फेरीत पोहोचणार होता. भारत पहिली लढत हरला होता; परंतु दुसऱ्या परतीच्या सामन्यात त्यांनी पोलिश संघाला पराभूत केले आणि आता वेळ आली टाय ब्रेकरची.
हा सामना दोन्ही संघांपैकी फक्त एका खेळाडूच्या निकालावर अवलंबून होता. पोलंडतर्फे मोनिका सोको तर भारतातर्फे हम्पी खेळणार होत्या. सामना बरोबरीत सुटू नये म्हणून पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या मोनिकाला सहा मिनिटे तर काळ्या सोंगट्यांनी खेळणाऱ्या हम्पीला फक्त पाच मिनिटे देण्यात आली होती; मात्र सामना बरोबरीत सुटला तर हम्पी (पर्यायाने भारत) विजयी होणार होती. अवघ्या बुद्धिबळ जगताचे डोळे या सामन्याकडे लागले होते. हम्पीने मोनिकाचा सहजी धुव्वा उडवून भारताला अंतिम फेरीत नेले होते आणि नंतर भारताला रशियन संघासोबत सुवर्णपदकाचा संयुक्त विजेता घोषित करण्यात आले, हा इतिहास आहे.
हम्पीने आतापर्यंत भारतासाठी खेळताना किती विक्रम केले, याची जंत्री केली तर लेख अपुरा पडेल. भारताची सर्वात लहान वयात महिला ग्रँडमास्टर आणि पाठोपाठ पुरुषांचे ग्रँडमास्टर किताब मिळवणाऱ्या हम्पीने अनेक आशियाई, राष्ट्रकुल आणि युवा गटात जगज्जेतेपदे मिळवली आहेत. भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्कार तर दिलाच; पण पद्मश्री देऊन तिचा सन्मान केला आहे. स्पोर्टस्टार साप्ताहिकाने हम्पीला गेल्या दशकातील सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून गौरविले होते.
हम्पी जवळजवळ ६५ देशांत जाऊन बुद्धिबळ खेळलेली आहे आणि बहुतेक वेळा तिने उच्च दर्जाचा खेळ दाखवला आहे. उगाच नाही बीबीसीने तिला २०२१ सालाची सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून तिचा सत्कार केला! ज्युडिथ पोल्गार तब्बल २५ वर्षे जगातील सर्वोच्च महिला खेळाडू होती; परंतु गेली अनेक वर्षे हम्पी जगातील दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू आणि त्यात पण एकदा जागतिक महिला अजिंक्यपद स्पर्धेत उपविजेती राहिलेली आहे. चिनी महिला खेळाडूंना टक्कर देण्याचे सामर्थ्य फक्त हम्पीने सातत्याने दाखवलेले आहे.
कोनेरू हम्पीचे हे सातत्य तिच्या लहानपणापासून आहे. जागतिक १०, १२, १४ वर्षांखालील मुलींची अजिंक्यपदे तिने लागोपाठ मिळवलीच; पण आशियाई स्पर्धेत मुलांच्या गटात भाग घेऊन तिने १९९९ साली सुवर्णपदक मिळवून सर्वांना थक्क केले होते.
हम्पी सर्व जगाच्या नजरेत भरली ती २००१ साली! १४ वर्षांच्या हम्पीने ग्रीसची राजधानी अथेन्स येथील जागतिक ज्युनियर (२० वर्षांखालील) मुलींची स्पर्धा जिंकून संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले होते आणि हे अजिंक्यपद नशिबाने मिळाले नव्हते, असे जगाला तिने पुढच्याच वर्षी दाखवून दिले. गोव्यात २००२ साली झालेल्या जागतिक ज्युनियर स्पर्धेत हम्पी आणि चीनची झाओ झू पहिल्या क्रमांकावर संयुक्त विराजमान झाल्या; पण हम्पीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
हम्पी फक्त भारतातील अजिंक्यपदांवर समाधानी नव्हती. तिने २००० आणि २००२ साली अनुक्रमे स्ट्रीट आणि टॉर्क येथे झालेल्या ब्रिटिश अजिंक्यपद स्पर्धेत भाग घेऊन साहेबांना (की मॅडमांना?) दणका दिला. २००३ साली पुणेकर अभिजित कुंटेने पुरुषांचे अजिंक्यपद जिंकल्यावर हे भारतीय इथे येऊन खेळतात आणि आमचा हक्क हिरावून घेतात, अशी ओरड ब्रिटिश खेळाडूंनी केली आणि लवकरच ब्रिटिश अजिंक्यपदाचे दरवाजे भारतीयांना बंद झाले.
हम्पी आता ३७ वर्षांची आहे आणि तिला सात वर्षांची मुलगी आहे. तरीही आज ती भारतातील अव्वल क्रमांकाची खेळाडू आहे. इतकी वर्षे सतत सर्वोच्च पदावर राहणे हे कठीण असते आणि विश्वनाथन आनंद आणि कोनेरू हम्पी या दिग्गजांनी ते साध्य केलेले आहे. न्यूयॉर्क स्पर्धेआधी एक महिना संगणकाला मदतीला घेतल्याशिवाय निव्वळ आपल्या प्रतिभेवर विसंबून भरपूर मेहनत करणाऱ्या हम्पीला मिळालेले यश हे तिच्या अद्वितीय बुद्धिमत्तेचे आहे आणि तिच्या हातून देशाला पुढेही पदके मिळतील, अशी आशा आहे.
(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)