(Free Meals in Shirdi) मुंबई : भाजपाचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी शिर्डीतील साईबाबा संस्थानमार्फत प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या मोफत भोजनाबद्दल टिप्पणी केली आहे. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यासंदर्भात अनावृत्त पत्र लिहून, सुजय विखे पाटील यांच्याबद्दलचा सर्वच लेखाजोखा मांडला. (Sushma Andhare criticizes Sujay Vikhe Patil)
शिर्डीतील एका कार्यक्रमात बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी, साईबाबा संस्थानने मोफत भोजनसेवा बंद करावी, असे आवाहन केले. फुकट जेवण मिळत असल्याने देशभरातील, महाराष्ट्रातील भिकारी शिर्डीत गोळा झाले आहेत. भोजनासाठी खर्च केले जाणारे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे. या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ आली तरी मागे-पुढे पाहणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. ‘सुजयजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी…’ असे सांगत सुषमा अंधारे यांनी सुजय विखे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
– Advertisement –
प्रिय सुजयजी,
श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईंची कीर्ती महती फक्त राज्यात आणि देशात नाही तर जगभरात आहे, त्यामुळे जगभरातील साईभक्त शिर्डीमध्ये येतात आणि यथाशक्ती दिलखुलासपणे दानधर्मही करतात. शिर्डीसंस्थानचे वार्षिक उत्पन्न सरासरी 850 कोटी रुपये आहे, असे माध्यमांमधून कळते. नवीन वर्ष, गुढीपाडवा किंवा गुरुपौर्णिमा या विशेष दिवशी येणारे हे दान अजून वेगळ्या पद्धतीचे असते. अर्थात, साईभक्त अत्यंत सढळ हाताने हे सगळे देतात कारण ‘स्नान से तन की शुद्धी होती हैं; मंत्र से मन की शुद्धी होती हैं और दान से धन की शुद्धी होती है’ असे मानणारा एक मोठा वर्ग आपल्या भारतीय परंपरेत आहे.
– Advertisement –
आधी साई भक्तांना 10 रुपयांच्या कुपनवर मिळणारे भोजन हळूहळू संस्थानाची देणगी वाढल्याने ही भोजनसेवा मोफत झाली. सुजयजी, शिर्डीतला अन्नप्रसाद तासन् तास रांगेत उभे राहून भक्तिभावाने ग्रहण केला जातो. फक्त गरिबीरेखेच्या खालचे किंवा मध्यमवर्गीय नाही तर धनाढ्य लोकसुद्धा रांगेत उभे राहून मोठ्या श्रद्धेने हा प्रसाद घेतात. मात्र भक्तांनाच भिकारी म्हणणे हा उन्मत्तपणा बरा नव्हे.
सुजयजी, आपण आपल्या विधानाच्या समर्थनात आता घुमजाव करताना हे पैसे शिक्षणासाठी वापरले जावेत, असे म्हणत आहात. मात्र सुजयजी, आपल्या PVP अर्थात पद्मश्री विखे पाटील शिक्षण संस्थेचे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा अभियांत्रिकी शिक्षण संस्था Sir Visvesvaraya Institute of Technology, नाशिक तसेच लोणी अहिल्यानगर, नाशिक, पुणे, संगमनेर अशा विविध ठिकाणी आपण सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यू, मेडिकल, इंजीनियरिंग, डेंटल, आयटीआय, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनर, डीएमएलटी, डीएड, बीएड, नर्सिंग यापैकी कोणते युनिट आहे की, ज्या युनिटमध्ये आपण मुलांना मोफत शिकवता?
आपल्या प्रत्येक युनिटमध्ये अगदी चौथी-पाचवीच्या मुलांना सुद्धा एक ते दीड लाख रुपये शुल्क आकारले जाते; परंतु त्याच निवासी शाळांमधून भोजनालय किंवा सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या लोकांना पाच ते सात हजार रुपयांवर राबवून घेतले जाते, तेव्हा आपला हा उदात्त समाजकार्याचा दृष्टिकोन कुठे जातो?
खरंच, गरजू गरीब मुलांना शिक्षण मिळावे आणि मोफत मिळावे, असे तुम्हाला वाटत असेल तर पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावे सुरू असणाऱ्या आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमार्फत सुरू असणाऱ्या या अनेक युनिट्समधून मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी तुम्हीच पुढाकार का बरं घेत नाही?
सुजयजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी… तुम्ही सुरू केलेले हॉस्पिटल सतत गजबजलेले असावे म्हणून साई संस्थानचे सर्व सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या रुग्णालयाला आणि तेथील मशीन्स चालवायला ऑपरेटर्स मिळत नाहीत. तुमच्या शाळेला विद्यार्थी मिळावे म्हणून संस्थानने बांधलेली शाळेची इमारत सुसज्ज असताना त्याचे लवकर उद्घाटन होऊ दिले जात नाही. मंदिराच्या परिसरात छोट्या-मोठ्या फुलविक्रेत्यांवर बंदी आणणारे तुम्ही समाधीवरच्या फुलांची अगरबत्ती इथे मिळेल म्हणून स्वतःच्याच ट्रस्टमार्फत अगरबत्तीचा स्टॉल चालवता.
थोडक्यात काय तर, सर्व मार्गांनी- सर्व दिशेने संपत्तीचा स्रोत हा आपल्याकडेच असला पाहिजे, हा तुमचा दुराग्रह नव्हे काय? सुजयजी, तुमचा नेमका आक्षेप कशावर आहे? संस्थानमध्ये मोफत भोजन देण्यावर की, या सगळ्या व्यवस्थेवर तुम्हाला पूर्णतः नियंत्रण मिळवता येत नाही यावर?
आता तर तुम्ही हद्द केली. तुम्ही चक्क भक्तांना भिकारी म्हणलात! मग निवडणुकीच्या काळात दारोदार लोकांकडे मत मागणारे तुम्ही, तुम्हाला काय म्हणायला हवे? सुजायजी, लवकर बरे व्हा..! हे लिहिताना मी शक्य तेवढे सबुरी राखली आहे. अपेक्षा असेल आपण सुद्धा सबुरीने घ्यावं.
बाबा आपणास सन्मती प्रदान करो!