पुढच्या वीस वर्षांचे बोला..!
esakal January 05, 2025 10:45 AM

हर्षद माने smartmaharashtra@gmail.com

महाराष्ट्र हा नेहमीच या देशाचे नेतृत्व करीत राहिलेला आहे. विविध क्षेत्रांमध्ये आणि विविध पिढ्यांमध्ये या देशाला नेतृत्व देऊ शकेल, अशी माणसे या मातीतून निर्माण झाली. भारत पुढील पंचवीस वर्षांमध्ये स्वातंत्र्याची शंभर वर्षे साजरी करणार आहे. तेव्हा आपल्या स्वप्नातील भारताचे नेतृत्वही महाराष्ट्रातल्या तरुणांनी करावे, यासाठी आजपासूनच तरुणाईवर गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

भारत हा तरुणांचा देश आहे, असे आपण म्हणतो. याला डेमोग्राफिक ६५% हून अधिक जनता ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. भारताचे आज सरासरी वय २९ आहे; मात्र याचा अर्थ असाही आहे, की आपल्या हातात वीस वर्षे आहेत. आजपासून वीस वर्षांनी ही पिढी साठीकडे झुकेल.

आजच्या या डेमोग्राफिक डिव्हिडंडचा सर्वोत्तम वापर केला तरच येणाऱ्या काळासाठी एक दिशा निश्चित होईल. याकरिता, तरुणांच्या प्रश्नांकडे सर्वाधिक लक्ष देणे नितांत आवश्यक आहे. पुढच्या वीस वर्षांत या तरुण पिढीचे काय करायचे आहे, याचे निश्चित उत्तर आपल्याकडे हवे आणि त्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न आवश्यक आहेत.

महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व केले आहे. प्रत्येक पिढीत अशी माणसे जन्माला आली ज्यांनी देशाला एक मार्ग दाखवला. पुष्कळशा नवीन गोष्टीचे सूतोवाच महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातील मंडळींनी केले. त्यामुळेच महाराष्ट्रातील तरुणांना उद्याच्या काळासाठी तयार करणारा कृती आराखडा हाती घेणे आवश्यक ठरते.

येणाऱ्या काळाचे भविष्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, हे एव्हाना जगभरात मान्य झाले आहे. अशा भविष्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांना सिद्ध करणे आवश्यक आहे. इंडस्ट्री ५.० या संकल्पनेत एआय, इंटरनेट ऑफ थिंग्ज, इंडस्ट्रिअल ऑटोमेशन, मशीन लर्निंग, रोबोटिक्स अशा गोष्टींचा काळ येऊ घातला आहे.

ऑगमेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी या शब्दांना बाजारामध्ये महत्त्व मिळू लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना या क्षेत्रात पूर्ण तयार करून पाठवणे आवश्यक आहे. यासाठी शालेय वयापासून रोबोटिक्ससारख्या विषयांचा समावेश व्हायला हवा. आंतरराष्ट्रीय बोर्ड शाळांमध्ये हे सुरू झाले आहे; मात्र महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये हे पोहोचण्यासाठी सरकारने आताच पावले उचलणे आवश्यक आहे.

येणारे युग हे जसे ‘एआय’चे आहे तसे सध्याचे युग आणि भविष्यही माहितीचे असेल. त्यामुळेच डेटा सायन्स या विषयाला महत्त्व आले आहे. या विषयात जितकी काम करणारी तरुण शक्ती आपण तयार करू, आपल्याला बेरोजगारीच्या समस्येला सक्षमतेने तोंड देता येईल. महाराष्ट्रातील तरुणांना देशपातळीवर आणि जागतिक पातळीवरही विकासाच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

सध्या महाराष्ट्रातील तरुण नोकरीच्या मळलेल्या पायवाटेने जाण्यास उत्सुक नाहीत. त्याला स्वतःचे काही नवीन उभे करायचे आहे. या उद्यमशीलतेतून यशस्वी गाथा उभ्या करण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षणाची आणि आर्थिक बळाची आवश्यकता आहे. हे प्रशिक्षण निव्वळ ‘उद्योजकता विकास कार्यक्रम’ या ढोबळ प्रकाराने न देता स्टार्टअपच्या जगताला साजेसे असे प्रशिक्षण आणि ज्याप्रमाणे स्टार्टअप्समध्ये वेंचर कॅपिटलिस्ट गुंतवणूक करतात त्या पद्धतीची गुंतवणूक करणारा एक वेंचर फंड महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी निर्माण करणे हे काम शासनाने हाती घेतले पाहिजे.

उद्योजकतेच्या पारंपरिक संकल्पना आता मागे पडत आहेत. आधुनिक काळातील तंत्रज्ञानावर आधारित विविध उद्योग सध्या गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरत आहेत. विशेषतः कृषी तंत्रज्ञान, पारंपरिक ऊर्जा स्रोत रोबोटिक्स, एआय अशा उद्योगांमध्ये महाराष्ट्राचा तरुण यावा, यासाठी ‘स्टार्ट अप मेंटरशिप’ कार्यक्रम शासनाच्या पातळीवर हाती घेतले गेले पाहिजेत. महाराष्ट्रातले स्टार्टर्स आणि युनिकॉर्न वाढावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाने शालेय आणि कॉलेज जीवनापासून आणि विशेषतः व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांमधून अधिकाधिक तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे, यासाठी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राच्या तरुणांना आर्थिक शिक्षणाचे धडे अगदी शालेय वयापासून देणे आवश्यक आहे. यासाठी पैशांचे व्यवस्थापन या विषयावर सरकारने शालेयस्तरावर अभ्यासक्रमामध्येच काही विषय समाविष्ट करणे आवश्यक आहे.

ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील उद्योजकांना सरकारने आर्थिक आणि तांत्रिक बळ पुरवले पाहिजे तीच आवश्यकता महाराष्ट्रातल्या कलाकारांनासुद्धा आहे. महाराष्ट्रामध्ये कलेचा फार श्रीमंत वारसा आहे; मात्र जेव्हा एखादा तरुण या विषयांमध्ये उमेदवारी करू इच्छितो तेव्हा त्याला प्रचंड आर्थिक त्रासाला आणि त्यामुळे मानसिक आणि कौटुंबिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. पूर्वी कलेला राजाश्रय होता, त्याप्रमाणे जर या नवीन उमेदवारी करणाऱ्या कलाकारांना शासनाचा आश्रय मिळाला तर महाराष्ट्रातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचेही उत्तम कलाकार तयार होतील.

तीच गोष्ट खेळाडूंचीसुद्धा! आपल्याला असे बरेच खेळाडू कदाचित माहितीही असतील ज्यांना आर्थिक तणावामुळे खेळ सोडून लौकिक अर्थार्जनाच्या वाटेवर चालावे लागले. यातून खूप खेळाडू महाराष्ट्र आणि देशानेही गमावले आहेत. हे टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने लहानपणापासूनच खेळाडूंची निवड करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यातून विविध खेळांमध्ये महाराष्ट्र ऑलिंपिक दर्जाचे खेळाडू भारताला देऊ शकेल. कला आणि खेळ या विषयांमध्ये रुची असणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाने हे ठोस उपक्रम राबवण्याची नितांत आवश्यकता आहे.

(लेखक मुंबईतील प्रबोधक युथ फेडरेशनचे अध्यक्ष आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.