आहाहा...
esakal January 05, 2025 10:45 AM

- संदीप खरे, saptrang@esakal.com

कोणातरी महानेत्याच्या जयंती वा मयंतीनिमित्ताने

नाचगाण्याची एक प्रचंड लॉरी निघाली आहे रस्त्यावरून

ताशी एक से.मी. गतीने!

प्रचंड गोंगाट आहे रस्त्यावर बाकी ट्रॅफिकचा

ऐकूच येत नाहीयेत गाणी

म्हणून स्पीकर्सचे ढीगचे ढीग चढवावे लागले आहेत लॉरीवर

घ्या... है आव्वाज?

आहाहा...

आजूबाजूच्या इमारती जुन्या सिनेमातील

भावनाव्याकूळ नायिकेसारख्या थरथरतायत मुळापासून!

खिडक्या तर कुठल्याही क्षणी उरी फुटतील असह्य आनंदाने!

घरांतील इस्पितळातील रुग्णमंडळी, अभ्यास करणारे विद्यार्थी

पाळण्याखाटांवरील आबालवृद्ध

सारे धुंदे झाले आहेत या सांद्र मधुर स्वरांनी!

कृतज्ञतेनं दुवा देत आहेत त्या महानेत्याला, महापुरुषाला!

त्याचेच नव्हे, तर त्यांच्या मातोश्रींचेही स्मरण होते आहे, वारंवार या निमित्ताने!

इतिहास विसरेल त्याला भविष्यकाळ विसरतो

आणि वर्तमानकाळ झोडपतो

हे आताशा रोजच पटते आहे लोकशाहीच्या पाइकांना!

आहाहा...

महानेत्याच्या महाकार्याच्या आणि विचारांच्या स्मरणात

धुंद नाचते आहे रस्त्यावर रंगीत गर्दी

शरीरशक्तीच्या मर्यादेमुळे पडू नये नाचण्यात खंड

म्हणून प्रसंगी जिवाची आणि लिव्हरची बाजी लावून

पितायत ऊर्जावर्धक पेय!

भर रस्त्यावर स्कूलबसेस, ॲम्ब्युलन्सेस

आणि इतर अशीच सामान्य, मूर्ख वाहने

फार मध्ये मध्ये येतायत, घाई करतायत विनाकारण

हॉर्न वाजवून वाजवून!!

व्यत्यय आणतायत महानेत्याच्या आराधनेत!

पण सच्च्या चेल्यांना त्याचाही भार वाटत नाही...अहाहा!

महानेता पाहतो आहे पुतळ्यातून, तसबिरीतून

श्रद्धेचा, भक्तीचा, मूल्यांचा, विचारांचा, आदराचा हा

नाचता गाता महासत्कार!!

मनातल्या मनात गुणगुणतो आहे तुकोबांचा अभंग

‘‘याचसाठी होता... केला अट्टाहास!’’.... आहाहा!!

आता तर पुतळा किंवा चित्र झाल्यावर

मोठ्याने बोलता तर येत नाहीच

पण कानही झाकता येत नाहीत

आणि पुन्हा एकदा डोळेही मिटता येत नाहीत...

... आहाहा ! आहाहा!!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.