प्रयागराज : प्रयागराजमध्ये येत्या १३ रोजी पौष पौर्णिमा स्नानाने महाकुंभमेळ्यास प्रारंभ होणार आहे. दर बारा वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. प्रयागराजमध्ये याआधी २०१३ मध्ये कुंभमेळा झाला होता. त्यानंतर यंदा वर्षांच्या प्रारंभी होणाऱ्या या महाकुंभात सहभागी होणाऱ्या साधू-महंतांबरोबरच सर्व भाविकांचे स्वागत करण्यासाठी ही संगमनगरी सज्ज झाली आहे. या कुंभमेळ्यात ४० कोटी भाविक सहभागी होणार असून त्यांच्यासाठी तीन हजार रेल्वे अन् दोनशे चार्टर्ड विमानांची सोय करण्यात आली आहे.
दरम्यान २०१३ आणि आता २०२५ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यातील व्यवस्थेत खूप फरक आहे, असे प्रयागराजला आलेले काही भाविकांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने हा मेळा भव्यदिव्य व्हावा, भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व तयारी केली आहे. राज्य सरकार महाकुंभवर पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार आहे.
गेल्या कुंभमेळ्यापेक्षा यंदा तीन पटीने जास्त भाविक येणार आहेत. २०१३ मध्ये १२ कोटी भाविक कुंभमेळ्यात सहभागी झाले होते. यावेळी ही संख्या ४० कोटी असेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. म्हणजेच २८ कोटी जास्त भाविक येतील.
कुंभमेळ्यास अद्याप आठ दिवस अवकाश असला तरी त्याच्या २० दिवस आधीपासूनच गर्दी होण्यास सुरुवात झाली असल्याने मुख्य स्थळापासून दीड किलोमीटर अंतरावरच बॅरिकेड लावून गाड्यांना प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रयागराजला (तत्कालीन अलाहाबाद) २०१३ मध्ये झालेल्या कुंभमेळ्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाचे सरकार होते. या दोन्ही कुंभमेळ्यांचा हा आढावा.
आधुनिक सोयीआकाश आणि पाण्यातही ड्रोनने निरीक्षण
बारा भाषांमधील
गुगल चॅटबॉट
पाण्याखालील सुरक्षेसाठी प्रथमच नदीत आठ किलोमीटर खोलपर्यंत बॅरिकेडची योजना
एआय कॅमेऱ्यांची माणसांवर नजर
एखाद्या भागात दोन हजार जण उभे राहण्याएवढी जागा असेल तर तिथे अठराशे व्यक्ती उपस्थित असल्यास लगेचच अधिकाऱ्याला त्याची माहिती दिली जाईल
चेहऱ्याची पडताळणी करणारे १०० कॅमेरे
दोन हजार ७०० सीसीटीव्ही बसविणार