>> धनंजय साठे
अतिशय नम्र आणि साधी अशी अदिती गोवित्रीकर फॅशनच्या दुनियेत प्रस्थापित झाली असूनही नवीन गोष्टींमध्ये रस घेत तिने वैद्यकशास्त्र व मानसशास्त्रात स्वतचे स्थान तयार केले. मेहनत, जिद्द आणि बुद्धीचा संगम अदितीच्या करिअरमध्ये पाहायला मिळतो. इतके सगळे मिळवूनही अदितीमध्ये आपुलकी आणि जिव्हाळा कायम आहे.
मला आजही आठवते ती संध्याकाळ… वांद्र्याच्या गजबजलेल्या रस्त्याने आमची गाडी वाट काढत निघाली होती. एका विश्वसुंदरीच्या घराच्या दिशेने. एका सिनेमाच्या प्रोजेक्टसंबंधात चर्चा करायला. तिची आणि माझी ती पहिली भेट नव्हती. हा प्रसंग सांगण्यामागचा हेतू काय आहे पुढे समजेलच. तर रस्त्यात इतकं ट्रफिक होतं आणि बाहेरची उष्णता गाडीत एसी चालू असूनही जाणवत होती. पोटात कावळे काव काव करायला लागले होते. माझा बिच्चारा मित्र गाडी चालवून त्रासलेला होता. भूक अनावर होत होती. बरं मधेच कुठे गाडी थांबवून पटकन पेटपूजा करायलाही वाव नव्हता. कारण आम्ही दिलेल्या वेळेच्या काही मिनिटं मागेच होतो. मित्राची कुरकुर आणि ‘भ’ची बाराखडी सुरू झाली होती. त्याच क्षणी मी माझा मोबाईल काढला आणि तिला कॉल केला. समोरून ‘हॅलो व्हेर आर यू?’ असे कोमल स्वर कानावर पडले.
तो गोड आवाज होता अनेक सौंदर्य स्पर्धांत विजेती ठरलेली, असंख्य मोठय़ा मोठय़ा ब्रँड्सचा चेहरा असलेली, मानसशास्त्रात तसंच वैद्यकीय शास्त्रात डिग्री घेतलेली मराठी मुलगी डा. अदिती गोवित्रीकर. आता पुढचं संभाषण काहीसं असं होतं. ‘अदिती आम्ही दहा मिनिटांत पोहोचतोय. फक्त हॉलमधला एसी लावून ठेव आणि प्रचंड भूक लागली आहे, तर छान पोहे आणि आल्याचा चहा तयार ठेव. आम्ही आलोच.’ समोरून `Yes my master… Anything else Sir?’ अशी कुचकट प्रतिक्रिया आली.
`Thanks! this will do’ असं माझं उत्तर ऐकून अदितीचा ‘ये वाट पाहतेय’ असा रिस्पॉन्स आला आणि मी कॉल कट केला. हे सगळं बोलणं चालू असताना माझा दिग्दर्शक मित्र तोंडाचा आ-वासून माझ्याकडे बघत राहिला. मी त्याची तंद्री तोडत म्हणालो, ‘चल मित्रा, तू भी क्या याद रखेगा, आपल्या जेवणाची सोय झाली.’ माझा मित्र दोन-तीन शिव्या हासडत म्हणाला, ‘तू अदिती गोवित्रीकरांना असं काय सांगतोय? येडा आहेस का तू?’ त्याला मी समजावलं की, आता पोचल्यावर बघ किती आपुलकीने आपलं स्वागत होईल… थोडय़ाच वेळात आम्ही अदितीच्या घरी पोहोचलो. तिने स्वत दार उघडलं आणि अतिशय प्रामाणिकपणे, प्रेमाने आमचं स्वागत केलं. अर्थात एसी चालू होता आणि पोह्यांचा घमघमघाटही सुटला होता. ही आपुलकी आणि जिव्हाळा आजही तसाच टिकून आहे, याचा मला अभिमान वाटतो.
पनवेलच्या बार्न्स स्कूलमधून तिने शालेय शिक्षण घेतलं. ASC कॉलेज पनवेलमधून अकरावी, बारावी केल्यावर ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. तिसऱया वर्षाला असतानाच तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागल्या. मग ऑफर्स इतक्या वाढल्या की, अदितीला मॉडेलिंग किंवा मेडिकल हा निर्णय घ्यावा लागला. तिने घरी आईवडिलांशी चर्चा केली आणि ठरवलं, एखाद्या वर्षाचा ब्रेक घेऊन पुन्हा शिक्षणाकडे वळावं. पण अदितीच्या प्रगतिपथावर ती वेळ आलीच नाही. मग अनेक जाहिराती, दक्षिणेतला त्या वेळचा सुपरस्टार चिरंजीवीचा भाऊ आणि सध्याचा आंध्र प्रदेशचा उपमुख्य मंत्री पवन कल्याण याच्यासोबत ‘तंबुडू’ हा सिनेमा केला जो प्रचंड गाजला. मग ‘सोच’, ‘16 डिसेंबर’सारखे सिनेमे, सोनू निगम, अदनान सामी, गोविंदा अशा स्टार मंडळींबरोबर व्हिडीओ अल्बम्स केले. त्याचबरोबर पाँड्स, गार्डन वरेलीसारख्या बडय़ा ब्रँड्सचा चेहरा ठरलेली अदिती प्रसिद्धीच्या झोतात होती. याबरोबरच ग्लॅडरॅग्ज मेगा माडेल, त्यानंतर मिसेस वर्ल्ड असे नामांकित सन्मान मिळवूनही आपल्या बौद्धिक पातळीचा स्तर तिने कधीच खाली घसरू दिला नाही. अतिशय नम्र आणि साधेपणा अदितीमध्ये भिनलेला आहे. फॅशनच्या दुनियेत प्रस्थापित असूनही शिकण्याची आणि नवनवीन गोष्टींमध्ये रस घेणाऱया अदितीने टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेसमधून मानसशास्त्रीय काऊंसेलिंगमध्ये पदवी घेतली आहे आणि नंतर तिने IGNOU मधून मास्टर्स पूर्ण केलं. त्यानंतर अमेरिकेतल्या प्रतिष्ठित हावर्ड विद्यापीठातून मास्टर्सची पदवी मिळवली. मेहनत, जिद्द आणि बुद्धीचा संगम अदितीच्या करीअरमध्ये पाहायला मिळतो. पण कौतुकाची गोष्ट अशी की, इतकं सगळं मिळवूनही ती अतिशय साधी, नम्र आणि विनयशील आहे. कोविडच्या काळात तिने अनेक मानसिकरीत्या त्रस्त झालेल्या लोकांना मार्गदर्शन केले होते.
माझी आणि अदितीची ओळख करून दिली ती अदितीची धाकटी बहीण आरजूने! आरजू माझी मालिका ‘किटू सब जानती है’मध्ये एक भूमिका करायची. त्यानंतर काही वर्षांनी पुन्हा आम्ही संपर्कात आलो तेव्हा तिने माझी अदितीशी ओळख करून दिली. त्यानंतर आरजू तिच्या कामाच्या व्यापात बिझी झाली. पण माझी आणि अदितीची मस्त मैत्री झाली. एकदा मी, माझा लेखक/दिग्दर्शक अदितीकडे एका सिनेमाच्या मीटिंगसाठी भेटलो तेव्हा इतक्या गप्पा रंगल्या की, रात्रीचे 12 कधी वाजले कळलंच नाही. तेव्हा अदितीने मला प्रसिद्ध स्ट्राबेरीचा अख्खा पॅक दिला होता. आम्ही घरी पोहोचेपर्यंत काहीतरी खायला असू दे म्हणून. इतकी माणुसकी क्वचितच पाहायला मिळते.
दोन वर्षांपूर्वी अदितीने स्वतचं ब्युटी पेजंट सुरू केलं आहे. Marvellous Mrs India नावाने! एक स्पर्धा दिल्लीला आणि दुसरी उदयपूरला संपन्न झाली. स्वत अदितीने हे क्षेत्र इतकं जवळून पाहिल्यामुळे त्यातले खाचखळगे चुकवण्यापासून स्पर्धकांना उत्तम अनुभव मिळावा यासाठी गौर गोपाळ दास यांची लेक्चर्स, फिटनेसमध्ये मिकी मेहता तसंच ब्रम्हकुमारी शिवानी या वेळ काढून अदितीच्या पेजंटसाठी मार्गदर्शन करण्यासाठी येतात. नयोनिका चॅटर्जी ही एकेकाळची नावाजलेली माडेल स्पर्धकांना रॅम्प वाक शिकवते. वाबींज मेहता कोरिओग्राफर म्हणून आपला बहुमूल्य वेळ देते आणि स्वत अदिती गोवित्रीकर आहेच. याव्यतिरिक्त अदितीने बिग बास आणि खतरों के खिलाडीसारख्या रिअॅलिटी शोजमधून आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. तर अशा या माझ्या खास मैत्रिणीला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो. खऱया अर्थाने ‘ब्युटी विथ ब्रेन’ची सार्थ हकदार एकच आहे… अदिती गोवित्रीकर!
(लेखक क्रिएटिव्ह डोके, अभिनेते आणि गायक आहेत.)