वडूज : येथे चोरट्यांनी बंद घराचे दार उचकटून घरांतील १५ तोळे सोन्याचे दागिन्यांसह १५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. याशिवाय चोरट्यांनी एकाच रात्रीत एका अंगणवाडीसह आणखी चार बंद घरेही फोडली. याठिकाणी चोरट्यांनी २० हजारांच्या मुद्देमालासह पाच हजारांची रोख रक्कम लांबविली. शहराला लागून असलेल्या पेडगाव रस्त्यावरील कर्मवीरनगर परिसराच्या पश्चिम बाजूच्या वसाहतींमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पेडगाव रस्त्यावर कर्मवीरनगर येथे संगीता देविदास कोळी यांचे घर आहे. कोळी या काल रात्री घराला कुलूप लावून नजीकच त्यांच्या बंधूंकडे गेल्या होत्या. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. चोरट्यांनी नेमके बंद घर असल्याचा डाव साधत घराच्या दाराचे कुलूप तोडून कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. आतमधील लोखंडी कपाट उघडून त्यामधील सुमारे आठ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, साडेपाच तोळे वजनाची मोहनमाळ, एक तोळे वजनाची कर्ण फुले असे सुमारे १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबविले. याशिवाय १५ हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केल्याचे कोळी यांनी सांगितले.
कर्मवीरनगराच्या पश्चिम बाजूला पाठीमागे असलेल्या वसाहतीत श्रीमती मुमताज नूरमहंमद शेख या वृद्धाही त्यांचे घर बंद करून नजीकच नातेवाइकांकडे झोपण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी नजीकच्याच घरात राहात असलेला सूरज भापकर हा युवक संगणकावर काम करीत होता. बाहेरून दारावर काहीतरी मारत असल्याचा आवाज आल्याने त्याने खिडकी उघडली असता तीन ते चार चोरटे घराचे कुलूप उचकटत असल्याचे दिसले.
त्या वेळी सूरज याने आरडाओरडा करताच चोरट्यांनी भापकर यांच्या खिडकीवर दगड मारून तेथून पलायन केले. त्यानंतर चोरट्यांनी करमारे वसाहतीमध्ये राहात असलेल्या हुतात्मा परशुराम विद्यालयातील शिक्षक महादेव भोकरे यांच्या बंद घराला लक्ष्य केले. श्री. भोकरे हे देखील काही कामानिमित्त परगावी गेल्याने त्यांच्या घरात कोणी नव्हते. चोरट्यांनी त्यांचे दाराचे कुलूप तोडून कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट उघडून त्यामधील साहित्याची उलथापालथ केली.
या घटनेत चोरट्यांनी पाच हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली. नजीकच राहात असलेले रोहिदास कदम (मूळ गाव गोडसेवाडी, ता. कोरेगाव, हल्ली रा. वडूज) हे नोकरीनिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. चोरट्यांनी श्री. कदम यांच्याही बंद घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी या घराचेही कुलूप व कडीकोयंडा उचकटून घरातील लोखंडी कपाटातील साहित्याची उलथापालथ केली. येथील इलेक्ट्रिक व्यावसायिक किशोर बाबूराव पवार यांच्या बंद खोलीच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतमधील सुमारे २० हजार रुपये किमतीचे विजेचे साहित्य लंपास केले, तसेच नजीकच असलेल्या एका अंगणवाडीच्या खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला.
आज सकाळी चोरीची घटना घडल्याचे समजताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे व सहकाऱ्यांनी भेट दिली. अधिक तपासासाठी साताऱ्याहून ठसेतज्ज्ञ व श्वानपथक मागविण्यात आले होते.
चोरटे तासभर परिसरातचश्रीमती शेख यांच्या बंद घराचा चोरीचा प्रयत्न भापकर यांच्या जागरूकतेमुळे फसल्यानंतर चोरट्यांनी तेथून पळ काढला असला, तरी नजीकच काही घरांत असलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये चोरटे सुमारे तासभर परिसरात घुटमळताना दिसून आले.
कोयंडा गँग..चोरीची पद्धत एकचयेथे चोऱ्या एकाच पद्धतीच्या असल्याचे जाणवते. बंद घरांना लक्ष्य करून त्या घरांची कुलपे, कडीकोयंडे तोडण्याची पद्धतही एकच असल्याचे दिसून येते. त्यामुळे या चोरीच्या घटनेमागे सराईत गुन्हेगारांची कोयंडा गँग असण्याची शक्यता व्यक्त होत असून, पोलिसांनी तातडीने चोरट्यांचा शोध घेण्याची नागरिकांतून मागणी होत आहे.