जागर – पिंगळा (लोकसंस्कृतीचा वाटाड्या)
Marathi January 05, 2025 04:25 PM

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक

भल्या पहाटे उठून एका हातात कंदील व दुसऱया हातात टाळ घेऊन रंगीबेरंगी फेटा, धोतर-सदरा आणि त्यावर कोट किंवा जाकीट अशा पेहरावात समाजाला नीतीच्या चार गोष्टी सांगत जनप्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम ‘पिंगळा’ हा लोककलावंत प्राचीन काळापासून करीत आहे. अलीकडच्या काळात पिंगळा हा उपासक दुर्मीळ होत चालला आहे. या लोककलेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन सध्या बदलला आहे.

टीव्ही आणि मोबाईल यांच्यामुळे अनेक लोककला लोप पावत चालल्या आहेत. महाराष्ट्रात वाघ्यामुरळी, भराडी, डाक घालणारे कुंभार, गोंधळी, भोपे, पोतराज, वासुदेव, नंदीवाले, खडी गंमत, तमासगीर, कडकलक्ष्मी, बहुरूपी, पिंगळा हे लोकांचे मनोरंजन करतानाच लोकांच्या मनावर चांगले संस्कार करून समाज जागृती करत असत. समाजातील सर्व थरांतील जनांचे रंजन करता करता लोकशिक्षणही देत असत. लोकरंजनातून लोकशिक्षण हाच उद्देश असणाऱया या लोककला व लोककलाकारांचे समाजबांधणीसाठी फार मोठे योगदान राहिले आहे. समाजातील जगरहाटीतील उपासना आणि संस्कृती जोपासण्याचे काम शेकडो वर्षे या लोककलांनीच केले आहे. या बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आणि संवर्धनासाठी या पारंपरिक लोककला जतन केल्या पाहिजेत.

पिंगळा हा कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता समाजप्रबोधन करण्यासाठी तो भल्या पहाटे लोकांना झोपेतून उठवून जगात नियतीने व सद्विचाराने कसे वागावे याचे धडे त्यांच्या गीतातून देतो, संस्कृती जोपासण्याचे काम पिंगळा करीत आला आहे. ‘आयाबायांनो, पिंगळा आला हो … सीतासावित्रींनो, पिंगळा आला हो…’ असे भल्या पहाटे म्हणून सर्व लोकांना आपलेसे करून व अत्यंत मधुर भाषेत बोलून, देवाधर्माची उदाहरणे देऊन लोकांच्या मनावर संस्कार करण्याचे काम पिंगळा करीत असे. त्यांना फार मोठय़ा अपेक्षा नसत. देतील त्यात ते समाधान मानत. दानधर्म केला की, ‘हरिश्चंद्राने दान केले की हो…! स्वप्नामध्ये राज्याचे दान केले की हो…!’ अशा पद्धतीने पुण्यकथन करत पौराणिक आणि धार्मिक संदर्भ देत. गाण्याच्या चाली स्वत लावत, लोकसंस्कृती जोपासण्यासाठी गावात एका झाडावर किंवा भिंतीवर चढून पिंगळा महाद्वारी बोली बोलतो, देखा ऐक ना ग बाई। तू रामनाम घेई मानव रे देह आला जन्माला। संसार केला। काही घे घे घे हरिनाम घे। माया तू सोडून दे। हात लावूनी नशिबाला। रडतो रं ठाई ठाई। या संसारापायी। तुम्ही गृहस्थ आहात. येथे सगळेच राहते बरं। माणूस मेल्यावर त्याचे। गावाबाहेर घर तुम्ही महेशान पैसा अडका। येथे सर्वच राहते बरं का। माणूस मेल्यावर येते संगे मातीचे मडके असे म्हणून लोकांमध्ये जाणीव जागृत करून वास्तवाचे ज्ञान देत ‘तू जन्माला आला आहेस, तू सोबत काही घेऊन जाणार नाहीस. त्यासाठी माया सोडून दे. या संसारापायी तू खोटं वागू नकोस. तू फक्त हरिनाम घे’ असं तो लोकांना अंतःकरणातून सांगत असे. लोकही त्यांचे बोलणे मन लावून ऐकत असत. तो म्हणतो, ‘हे तुमच्या मागचे सुना-पोरे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे ते तुमच्याजवळ आहेत. तुमच्याकडे काही जर पैसा नसेल तर ते तुम्हाला भेटणारसुद्धा नाहीत. माणूस मेल्यावर सोबत मातीचे मडकेसुद्धा नेत नाही. ज्यावेळेस सिकंदरने संपूर्ण जग जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आणि तो जिंकत आला; परंतु त्याला घरी परत जाता आले नाही. वाटेतच तो बॅबिलोन येथे मरण पावला. मरण्याच्या अगोदर सैनिकांना त्याने सांगितले होते की, तिरडीवरून स्मशानात नेताना माझे दोन्ही हात बाजूला खाली सोडून द्यावे; कारण लोकांना कळू द्या की, मी जग जिंकलो असलो तरीही सोबत जाताना फुटकी कवडीसुद्धा नेता आली नाही.’ असा  संदर्भ देऊन पिंगळा लोकांच्या डोळय़ात झणझणीत अंजन घालतो.

पिंगळा आपल्या मुखावटे लोकांमध्ये अंधश्रद्धेबद्दल व मायावादाबद्दल बोलून समाज जागृती करत असे. ‘तुम्हाला वाटत असेल की, आमच्याकडे घोडे, हत्ती आहेत. बंगला आहे, गाडय़ा आहेत. आमच्याकडे सर्व काही आहे, पण तुम्ही गर्व करू नका. रावणाची अखंड लंका सोन्याची होती, पण रावण मेला आणि लंकाही जळाली, तशी आपली गत होईल’, असे सांगत पिंगळा बरोबर मर्मावर बोट ठेवून लोकांना ज्ञान सांगत असे. पिंगळा हा मराठी लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनला होता. त्यांना सूर्याचा सेवक मानले जाते. आपल्या कुलदैवताच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी तो भल्या पहाटे गावात येत असतो म्हणून त्याला प्रभातीचा दूत असेही जुन्या काळात म्हटले जायचे. भारतीय परंपरेत लोककलांना विशेष महत्त्व आहे. लोककला लोकजीवनाच्या आविष्काराचे माध्यम असतात. लोकजीवनाकडे पाहण्यासाठी लोककलावंत भावभावना, कल्पना, परंपरा, लोकजीवनातील पद्धती, चालीरीती आदींचा चपखलपणे वापर करीत. या सर्व लोककलांना समाजजीवनात मानाचे स्थान होते. सर्व लोककला एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे आपोआप मिळतात. शिवाय दुसरी पिढी आपल्या प्रकृतीनुसार त्यात भर टाकत असते. त्यामुळे लोककला परंपरा आणि परिवर्तन याचा मेळ सतत बसत असतो. लोककलांचा आविष्कार सदैव ताजा व जिवंत दृश्यातून असतो. कृत्रिमता, नाटकीपणा अजिबात नसतो.

लोककलांची परंपरा आदिमानव काळापासून आहे. पिंगळा एखाद्या झाडावर चढून देवाचे गीत म्हणून तो दान, भिक्षा मागायचा, त्यामुळे गावातील महिला, मुलेबाळे त्यांना दान म्हणून कपडे आणून देत. बहुरूपी हे लोकांना हसून किंवा गंभीर करून वेगवेगळे मजेशीर किस्से सांगून हसवतात, वासुदेव हा आपल्या मागील पिढीच्या कुळाचा उद्धार करून देवाचे नाव घेतात, पोतराज हे देवीदेवतांचे गाणे गाऊन लोकांचे समाजप्रबोधन करीत. परंतु आता काळ बदलला, लोकांच्या गरजा वाढल्या. असे रोज गावागावात फिरून आपल्याला काही मिळणार नाही, भविष्यामध्ये आपल्यात सुधारणा होणार नाही असे यांना समजल्यामुळे ह्या लोकसंस्कृतीच्या उपासकांची संख्या आता कमी कमी होत चालली आहे. याशिवाय शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्यामुळे व शिक्षण, नोकरी यात शासनाने सवलत व आरक्षण दिल्याने या पारंपरिक लोककलेकडे नव्या पिढीने पाठ फिरविली आहे.

पूर्वीचा गावगाडा चांगला असायचा. लोकं एकमेकांशी प्रेमाने बोलत होती, दान देत होती. घेणाऱयाची गरज कमी होती. तेवढेच घेऊन तेवढेच खायचे, अंगावर चिंध्या आणि शिलाई न केलेले कपडे वापरायचे. डोक्यावर टोपी असायची. हातात घुंगराची काठी व डमरू असायचा. हातात कंदील घेऊन पहाटे अंधारातून ते येत. हे लोक मनाने फार सोज्वळ व निष्ठावान होती. गावातील लोकही त्यांना जवळ करायचे. आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो म्हणून द्यायचे म्हणून पिंगळा हा सर्वत्र आनंदाने जीवन जगायचा. गावोगाव तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवायचा. अशी ही परंपरागत पद्धत चालत होती. ग्रामीण भागामध्ये लोकांची करमणूक करण्याचे काम ते करीत. शिवाय भविष्यही सांगायचा. त्यामुळे कोणालाही ते बाहेरचे, दूरचे वाटत नव्हते. आपल्या कलेतून ते लोकांना वळण लावण्याचे कार्य करत. सद्वृत्ती जोपासण्याचे काम करत असत. आता काळ बदलला. लोकं सुशिक्षित झाली. त्यामुळे असे करणारा वर्ग फार कमी झाला. आता जुने कपडे घेणे हेसुद्धा कमीपणाचे वाटू लागले. शहरात रोजगार चांगला मिळत असल्यामुळे याकडे दुर्लक्ष झाले. प्रत्येक जिह्याला एक समिती तयार करून त्यातून लोककला व संस्कृती संवर्धन करण्यासाठी एकत्र झाले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात समाज शिक्षित झाला. त्यामुळे लोककलेकडे दुर्लक्ष झाले. आधुनिक समाज पैशाने श्रीमंत झाला असला तरी संस्कृतीने तो पाठीमागे राहत आहे. आज लोकसंस्कृती जपणाऱया लोककला आणि लोककलावंत यांची खरोखरच गरज आहे असे वाटते.

karveerkashi@yahoo.co.in

(लेखक मानसशास्त्र व लोककलेचे अभ्यासक आहेत.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.