Ahilyanagar News : घोटी रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा; अकोलेत सार्वजनिक बांधकाम, नगरपंचायतीची संयुक्त कारवाई
esakal January 05, 2025 04:45 PM

अकोले : अकोले शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्ता कोल्हार - घोटी राज्य मार्गालगतची अतिक्रमणे काढण्याची मोहीम राबविण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले व अकोले नगरपंचायतीने संयुक्तपणे ही कारवाई पोलिसांच्या बंदोबस्तात सुरू केली आहे.

अकोले शहरातील काही सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी अकोल्याचे तहसीलदार डॉ.सिद्धार्थ मोरे यांना एक निवेदन काही दिवसांपूर्वी दिले होते. यानंतर डॉ. मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकोले, अकोले नगर पंचायतीच्या अधिकारी, पदाधिकारी व मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांसमवेत एक बैठक घेतली होती. त्यानंतर स्वतः तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, अकोले पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनोज मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मोरे, शाखा अभियंता पाचोरकर, अकोले नगर पंचायतीचे मुख्याधिकारी पंकज गोसावी, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी महात्मा फुले चौकापासून ते नवलेवडी फाटा या दरम्यान अतिक्रमणाची पाहणी केली होती.

यानंतर त्यांना तोंडी सूचना देण्यात आल्या. त्या नंतर त्यांना लेखी नोटीस बजावली. शहरात दवंडी ही देण्यात आली. परंतु, ही अतिक्रमणे मुदतीत स्वतः हून न काढल्याने मंगळवारी सकाळपासून नवलेवडी फाट्यापासून अतिक्रमणे काढायला अकोले नगर पंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले यांनी संयुक्त कारवाई सुरू केली.

यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा दुकानांच्यासमोर असणारे बोर्ड, छत्र्या, पत्र्याच्या शेड, पडव्या, रस्त्यालगत असलेल्या टपऱ्या, लोखंडी बाकडे, हातगाड्या, जेसीबी व कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हलविण्यात आल्या. किंबहुना हे सर्व साहित्य, वस्तू प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. विस्थापित झालेल्या व्यावसायिकांनी या मोहिमेला विरोध केला. परंतु, तो विरोध प्रशासनाने मोडीत काढून त्यांना समज दिली.

रहदारी सुरळीत होईल

दुसरीकडे रहदारीला अडथळा करणाऱ्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने या कारवाईचे स्वागत देखील करण्यात येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा असणारी अतिक्रमणे काढल्याने रहदारी सुरळीत होईल, असा आशावाद प्रशासनाने व्यक्त केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.