वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन हे आज रविवारी भारतात येत असून त्यांची भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी, तसेच अन्य नेत्यांशी चर्चा होणार आहे. सुलिव्हन यांचा हा भारत दौरा दोन दिवसांचा आहे. चीनचा ब्रम्हपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधण्याचा प्रकल्प आणि त्यामुळे भारताला असलेला धोका, तसे बांगला देशातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार, हे त्यांच्या दौऱ्याचे मुख्य विषय आहेत, अशी माहिती आहे.
चीनने सीमावर्ती नद्यांच्या वरच्या भागांमध्ये धरणे बांधण्याचा सपाटा लावला आहे. ही धरणे पर्यावरणासाठी घातक आहेतच. तसेच ती खालच्या भागांमध्ये असणाऱ्या देशांसाठीही अत्यंत धोकादायक आहेत. अमेरिकेला याची जाणीव आहे. त्यामुळे सुलिव्हन यांच्या भारत दौऱ्यात या संबंधात निश्चितपणे चर्चा होईल, असे प्रतिपादन अमेरिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने केले. अमेरिकेत 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रंप यांचा शपथविधी होणार आहे. त्याआधीचा हा कोणत्याही उच्चपदस्थ अमेरिकन अधिकाऱ्याचा विद्यमान जोसेफ बायडेन सरकारच्या काळातील शेवटचा भारत दौरा ठरण्याची शक्यता आहे. अमेरिकेत नवे प्रशासन स्थानापन्न झाल्यानंतर याच महत्वाच्या विषयांवर पुन्हा एकदा त्या देशाशी भारत संवाद साधणार आहे. भारतासाठी दहशतवाद, पाकिस्तान, चीन आणि बांगला देशातील हिंदूंची दयनीय स्थिती, हे महत्वाचे विषय आहेत, अशी माहिती भारताकडून देण्यात आली आहे.