वृत्तसंस्था/ अगरळता
पश्चिम त्रिपुराच्या मोहनपूर येथे पिकनिकसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बसला आग लागली. या दुर्घटनेत 13 शालेय विद्यार्थी होरपळले आहेत. यातील 9 विद्यार्थ्यांना जीबीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उर्वरित 4 जणांना स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार झाल्यावर घरी पाठवून देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक किरण कुमार यांनी दिली आहे. बसमध्ये ठेवण्यात आलेल्या जनरेटरच्या विस्फोटामुळे ही आग लागली होती. याप्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या दुर्घटनेवर गंभीर चिंता व्यक्त करत सर्व जखमी विद्यार्थी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना केली आहे. प्रशासन स्थितीवर पूर्ण नजर ठेवून जखमी विद्यार्थ्यांना त्वरित वैद्यकीय सुविधा उपलब्ध करविण्यात आली आहे. लोकांनी पिकनिकचा आनंद घेताना सतर्क अन् सावध रहावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.