बीडच्या मस्साजोचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपेडट समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणातील ४ प्रमुख आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना भिवंडी कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी ११ डिसेंबर रोजी भिवंडीतील वळगाव येथे आले होते अशी माहिती तपासातून उघड झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख यांचे मारेकरी भिवंडीच्या वळगाव येथील स्वरीत बिअर शॉप आणि हॉटेल दिपाली वाईन आणि डाईन बार अँड रेस्टॉरंट येथे आले होते. कारण या बिअर शॉपमध्ये या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या गावी राहणारा रवी बारगजे काम करत होता. त्यामुळे सुदर्शन घुले आणि त्याचे इतर साथीदार संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर लपण्यासाठी जागा मिळावी म्हणून भिवंडीत आले होते.
या सर्व आरोपींनी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख डॉ. सोन्या पाटील यांचे कार्यालय गाठले. तिथून त्यांनी बिअर शॉपचे मालक विक्रम डोईफोडे यांचा पत्ता मिळवला आणि त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतू ते ८ डिसेंबरलाच वैष्णोदेवी येथे फिरण्यास गेले होते. त्यानंतर ते स्वरीत बिअर शॉप आणि हॉटेल दिपाली बार अँड रेस्टॉरंट येथे पोहोचले.
हॉटेल दिपाली येथे हे सर्व आरोपी गेले होते खरं पण त्यांना तिथे घेतले नाही. हे सर्व आरोपी हॉटेल दिपाला पोहचल्यावतर तेथील कर्मचाऱ्यांनी ते आले असल्याची माहिती विक्रम डोईफोडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी त्यांना स्पष्ट नकार दिला आणि त्यावेळी सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार थोड्या वेळात येतो असे सांगून निघाले तर पुन्हा परत आले नाही. या प्रकरणी बीड येथील तपास यंत्रणा या दोघांकडे चौकशीसाठी येऊन गेले आहेत.