Sujay Vikhe Patil : मोफत भोजनामुळे शिर्डीत भिकारी वाढले; डॉ. सुजय विखे यांचे वक्तव्य सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप
esakal January 06, 2025 09:45 AM

शिर्डी : साई संस्थानच्या भोजनालयात मोफत भोजन देऊ नये. संपूर्ण देश शिर्डीत येऊन फुकट जेवतो. संपूर्ण महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले. हे योग्य नाही. मोफत भोजन बंद करा. भोजनासाठी पंचवीस रुपये आकरणी करा. जो पैसा वाचेल, तो येथील मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी खर्च करा, हे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल केलेले वक्तव्य आज सोशल मीडियावर प्रचंड वादग्रस्त ठरले.

प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की साई संस्थानकडे तब्बल आठशे कोटी रुपयांचा अन्नदान फंड आहे. तो अन्यत्र खर्च करता येत नाही. मोफत भोजन देऊन देखील अन्नदान फंडात दरवर्षी शंभर कोटी रुपयांची अधिकची रक्कम जमा होत असते. त्यामुळे मोफत भोजन देण्याचा साई संस्थानचा निर्णय योग्य आहे.

१९२२ मध्ये साई संस्थानची स्थापना झाली. संतकवी दासगणू महाराज हे संस्थानचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी ३६ वर्षे अध्यक्षपद सांभाळले आणि पायाला भिंगरी लावून कीर्तन व प्रवचानाच्या माध्यमातून साईंच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसार केला. त्यांनी साई संस्थानच्या घटनेत अन्नदान फंडाची तरतुद केली.

शिवाय या फंडातील रक्कम अन्नदानाशिवाय अन्यत्र खर्च करता येणार नाही, अशी तरतुद देखील केली. त्यामुळे सध्या शिल्लक असलेल्या अन्नदान फंडाचा अन्य कारणासाठी म्हणजे विखे पाटील मागणी करतात त्याप्रमाणे शिक्षणासाठी खर्च करता येणे कायद्यान्वये शक्य होणार नाही.साईबाबांनी त्यांच्या हयातीत अन्नदानाला सर्वोच्च प्राधान्य दिले.

भारतीय संस्कृतीत अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. माहितीच्या अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे यांनी साई संस्थानच्या संकेतस्थळावरील माहितीचा आधार घेऊन केलेल्या विश्लेषणानुसार, अन्नदान फंडात ८०० कोटी रुपये जमा आहेत. त्यावर दरवर्षी चाळीस ते पन्नास कोटी रुपये व्याज मिळते. मोफत अन्नदानासाठी वर्षाकाठी ९३ कोटी रुपये खर्च येतो.

भिक्षेकऱ्यांच्या अन्नदानाची परंपरा जुनीच

साईसंस्थानच्या प्रसादालयात दररोज तीस ते चाळीस हजार भाविक मोफत भोजन घेतात. त्यात भिक्षेकरी आणि रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या गरजूंची संख्या देखील मोठी आहे. भिक्षेकऱ्यांमुळे काही प्रश्न देखील निर्माण झाले आहेत.

मात्र मोफत अन्नदानाची परंपरा साईबाबांनी सुरू केली. संस्थानच्या भोजनालयात भिक्षेकऱ्यांना मोफत भोजन देण्याची परंपरा पूर्वीपासून सुरू होती. कारण पुढे साई संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष सुरेश हावरे यांनी अन्नदान फंडातील वाढती रक्कम लक्षात घेऊन सर्वांसाठी मोफत अन्नदान सुरू केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.