नवे वर्ष नव्या नव्या
esakal January 06, 2025 11:45 AM

भूषण गोडबोले

नुकत्याच सरलेल्या २०२४ चे आर्थिक गुंतवणुकीबाबत सिंहावलोकन केल्यास, शेअर बाजार, सोने-चांदी आणि म्युच्युअल फंड या प्रमुख तीन पर्यायांमध्ये सोन्याने तब्बल २१ टक्के परतावा दिला, जो इतर सर्व गुंतवणूक पर्यायांपेक्षा अधिक होता, असे दिसून येते. ऑगस्ट २०२० मध्ये ५६,१९४ रुपयांचा उच्चांक दर्शविल्यानंतर जानेवारी २०२३ पर्यंत सोन्याचा भाव मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शवित होता, यानंतर मागील दोन वर्षांत सोन्यामध्ये उत्तम परतावा मिळाला आहे.

भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ यांनी वर्षभरात अनुक्रमे ८.१७ टक्के व ८.८० टक्के परतावा दिला. सप्टेंबर महिन्यात ‘सेन्सेक्स’ने ८५,९७८ अंश व ‘निफ्टी’ने २६,२७७ अंश या उच्चांकांवर पोहोचून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आशादायक संकेत दिले. आता नव्या वर्षात शेअर बाजाराची वाटचाल कशी राहील? सोन्याची झळाळी कायम राहील का आणि म्युच्युअल फंडही मनासारख्या परताव्याचे दान पदरात टाकतील का? असे प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदारांना पडत आहेत.

‘निफ्टी’ मूल्यांकन

तीन जानेवारी २०२५ रोजी ‘निफ्टी’चे किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पीई रेशो) २२ आहे, तर किंमत-पुस्तक मूल्य गुणोत्तर (पीबी रेशो) ३.५८, तसेच लाभांश उत्पन्न १.२६ टक्के आहे. एक जानेवारी २०२४ रोजी अनुक्रमे (पीई) २३, (प्राईज टू बुक व्हॅल्यू) ३.८३ आणि १.२८ टक्के होते. मागील वर्षाच्या तुलनेत ‘निफ्टी’चे मूल्यांकन थोडेसे स्वस्त झाले आहे. मात्र, अद्याप महागड्या श्रेणीतच आहे. एकूण बाजार भांडवलाचे (मार्केट कॅप) देशाच्या एकूण उत्पादनाशी (जीडीपी) असलेले प्रमाण हे शेअर बाजाराचे मूल्यांकन समजण्यासाठी एक महत्त्वाचे मानक मानला जाते.

सध्या हे प्रमाण ११९ टक्के आहे. या गुणोत्तराचा गेल्या दहा वर्षांतील उच्चांक १३९ टक्के; तसेच नीचांक ५८ टक्के होता. सध्याच्या पातळीवर भारतीय शेअर बाजार यानुसार तुलनात्मकदृष्ट्या माफकप्रमाणात महाग असल्याचे निर्देशन होत आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने दीर्घावधीमध्ये कंपन्यांनी मिळकतीमध्ये उत्तम कामगिरी केली, तर सध्याचे मूल्यांकनदेखील समर्थनीय ठरू शकेल.

देशाच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी कर्ज आणि उत्पन्न यांचे प्रमाण हे एक महत्त्वाचे परिमाण असते. सध्या भारताचे कर्ज आणि उत्पन्न गुणोत्तर सुमारे ८३ टक्के आहे. उच्च कर्जाचे प्रमाण देशाच्या वित्तीय धोरणांवर आणि दीर्घकालीन आर्थिक विकासावर प्रभाव टाकते. आर्थिक स्थैर्य आणि दीर्घकालीन विकास साधण्यासाठी सरकारने कर्ज व्यवस्थापनावर आणि वित्तीय उत्तरदायित्वावर भर देणे अपेक्षित आहे.

शेअर बाजारात डिक्सन टेक्नॉलॉजीज, डिव्हीज लॅब, एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी, ॲबॉट इंडिया, पेज इंडस्ट्रीज, मुथूट फायनान्स, आयशर मोटर्स अशा प्रकारच्या ज्या कंपन्या प्रतिवर्ष सुमारे १५ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळवत व्यवसायात प्रगती करत आहेत, अशा कंपन्यांच्या शेअरनी २०२४ मध्ये गुंतवणूकदारांना उत्तम परतावा दिला मात्र, अशाप्रकारे परतावा देण्यापूर्वी या कंपन्यांच्या शेअरनीदेखील याआधी काही काळ पडझड आणि मर्यादित पातळ्यांमध्ये चढ-उतार दर्शविले होते.

या क्षेत्रांवर द्या लक्ष!

सध्या पेंट, खासगी बँकिंग, विमा, रोगनिदान चाचणी, आयटी आदी क्षेत्रातील भांडवलावर उत्तम परतावा मिळवणाऱ्या अग्रगण्य कंपन्या आव्हानात्मक काळात पडझड अथवा मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शवत आहेत.

दीर्घावधीसाठी गुंतवणूक करताना अशाप्रकारे ज्या क्षेत्रातील कंपन्याचे शेअर तुलनात्मक पडझड अथवा मर्यादित पातळ्यांमध्येच चढ-उतार दर्शवित आहेत, मात्र दीर्घावधीमध्ये ज्या कंपन्या भांडवलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसायवृद्धी करू शकतात, अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये शक्यता आणि क्षमता लक्षात घेता जोखीम लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात गुंतवणूक करण्याचा गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.

गुंतवणूक करताना आपली उद्दिष्टे ठरवा, जोखीम व्यवस्थापनासाठी विविध मालमत्ता वर्गांमध्ये संतुलित गुंतवणूक करा. दीर्घकालीन स्थिर परतावा मिळवण्यास विविधता मदत करते. गुंतवणूक हा एक शिस्तबद्ध आणि संयमी प्रवास आहे, हे नेहमी लक्षात ठेवा.

(डिस्क्लेमर ः या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.