पत्रकार हत्येतील मुख्य आरोपीला अटक
Marathi January 08, 2025 12:24 AM

सुरेश चंद्राकर याला हैदराबादमधून घेतले ताब्यात

वृत्तसंस्था / हैद्राबाद

छत्तीसगड राज्यातील युवा पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुरेश चंद्राकर याला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे. मुकेश चंद्राकर हे मुक्त पत्रकार होते. ते 1 जानेवारीपासून बेपत्ता होते. 4 जानेवारीला त्यांचा मृतदेह सुरेश चंद्राकर यांच्या मालकीच्या इमारतीच्या सेप्टीक टँकमध्ये सापडला होता. सुरेश चंद्राकर याला रविवारी अटक करण्यात आली.

मुख्य आरोपी हैदराबाद येथे आपल्या कारचालकाच्या निवासस्थानी लपून राहिलेला होता. ही माहिती मिळताच छत्तीसगड पोलिसांनी त्याला हैदराबाद येथे जाऊन ताब्यात घेतले. मुख्य आरोपीचा माग पोलिसांनी 200 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून आणि 300 हून अधिक मोबाईल क्रमांक पडताळून काढला आहे. मुख्य आरोपी हा पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा दूरचा नातेवाईक असल्याची माहिती देण्यात आली आहे. छत्तीसगड पोलिसांनी मुख्य आरोपीच्या सखोल चौकशीस प्रारंभ केला असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये या प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बँक खाती गोठवली

सुरेश चंद्राकर याला अटक करण्यापूर्वी पोलीसांनी त्याची चार बँक खाती गोठविली आहेत. तसेच, त्याच्याशी संबंधित असणारी एक बेकायदेशीर इमारत पाडविली आहे. त्याच्या पत्नीलाही ताब्यात घेण्यात आले असून तिचीही चौकशी केली जात आहे. तिचाही या प्रकरणात हात असल्याची शक्यता आहे.

प्रकरण काय आहे…

मुकेश चंद्राकर हे मुक्त पत्रकार होते. ते 1 जानेवारीला छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील पुजारी पाडा या गावातील त्यांच्या राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. त्यांचे बंधू योगेश यांनी पोलिसांकडे त्यासंबंधीची तक्रार सादर केली होती. तक्रार सादर केल्यानंतर तीन दिवसांनी मुकेश यांचा मृतदेह सुरेश चंद्राकर याच्या बस्तर जिल्ह्यातील इमारतीच्या सेप्टीक टँकमध्ये सापडला होता. सुरेश चंद्राकर हा कंत्राटदार आहे. मृतदेहाचे डोके, चेहरा, छाती आणि पोटावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. त्यामुळे सुरेश चंद्राकर याचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला.

वादावादीनंतर हत्या

मुकेश चंद्राकर याची हत्या होण्यापूर्वी त्याची त्याचा मेहुणा रितेश चंद्राकर आणि एक पर्यवेक्षक महेंद्र रामटेके यांच्याशी एका जेवणाच्या कार्यक्रमात जोरदार वादावादी झाली होती. तेथेच मुकेश याला लोखंडी कांबींनी मारहाण करण्यात आली होती. मारहाणीमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. हा गुन्हा लपविण्यासाठी या दोघांनी मुकेश याचा मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकून टँक वरुन सिमेंटने बंद केला. टाकी सिमेंटने बंद करत असल्याचे दीनेश चंद्राकर याने पाहिले होते.

सुरेश चंद्राकर मुख्य आरोपी

मुकेश याची हत्या सुरेश चंद्राकर याने घडवून आणल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अखेर हैदराबाद येथे तो लपून बसल्याची माहिती मिळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. ही हत्या का करण्यात आली, याचा शोध घेतला जात असून आतापर्यंत सुरेश चंद्राकर याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. मुकेश चंद्राकर याने मार्गनिर्मिती कार्यातील भ्रष्टाचार बाहेर काढणारा लेख प्रसिद्ध केला होता. त्यातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप याला दुजोरा मिळालेला नाही. मुख्य आरोपी सुरेश चंद्राकर हा काँग्रेसचे छत्तीसगड राज्यशाखेचे अध्यक्ष बैज यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. आरोपींचे कोणाशीही लागेबांधे असले, तरी त्यांची गय केली जाणार नाही. या प्रकरणात बळी पडलेल्या पत्रकाराला लवकरात लवकर न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी दिले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.