Happy Birthday Kapil Dev: १७५ धावांची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी ते विश्वविक्रमी ऑलराऊंडर; कपिल देव यांचे माहित नसलेले विक्रम
esakal January 06, 2025 04:45 PM

Kapil Dev Records: भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज कर्णधार आणि अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांचा आज (६ जानेवारी) ६६ वा वाढदिवस. चंदीगढमध्ये ६ जानेवारी १९५९ मध्ये कपिल देव यांचा जन्म झाला. वेगवान गोलंदाजी करणारे कपिल देव यांनी भारतासाठी वेगवान गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही मोलंचं योगदान दिलं.

ते भारताचे पहिले विश्वविजेते कर्णधारही ठरले. त्यांनी १९८३ सालचा वर्ल्ड कप त्यांच्या नेतृत्वात भारताला मिळवून दिला. तो विजय भारतीय क्रिकेटमध्ये क्रांती घडवणाराही ठरला. पुढे देखील कपिल देव यांनी मोठं यश मिळवलं.

कपिल देव यांची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

त्यांनी १९७८ साली पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याच वर्षी त्यांनी कसोटीतही पदार्पण केले. त्यांनी भारताकडून खेळताना १३१ कसोटी सामने खेळताना ४३४ विकेट्स घेतले, तर८ शतकांसह ५२४८ धावा देखील केल्या.

वनडेमध्ये त्यांनी २२५ सामने खेळताना २५३ विकेट्स घेतल्या, तसेच ३७८३ धावा केल्या. त्यांनी १९७८ ते १९९४ या दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. यातील काही विक्रम अनेकांना माहित नसतील. अशात काही विक्रमांवर नजर टाकू.

कसोटीत कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक विकेट्स

कपिल देव यांनी कर्णधार म्हणून कसोटीत एका डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्यांनी १९८३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबादला झालेल्या सामन्यात दुसऱ्या डावात ८३ धावा देताना ९ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र तो सामना वेस्ट इंडिजने १३८ धावांनी जिंकला होता.

वनडेत ६ व्या क्रमांकावर १७५ धावा

वनडेमध्ये ६ व्या क्रमांकावर सर्वोच्च धावांची खेळी करण्याचा विक्रम २०२३ पर्यंत कपिल देव यांच्या नावावर होता. त्यांनी १८ जून १९८३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ६ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. पण हा विक्रम नोव्हेंबर २०२३ मध्ये ग्लेन मॅक्सवेलने ६ व्या क्रमांकावर अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद २०१ धावांची खेळी करत मोडला. त्यामुळे सध्या ते या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

वनडेत ९ व्या विकेटसाठी दुसरी सर्वोच्च भागीदारी

वनडेमध्ये ९ व्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करणाऱ्या जोड्यांमध्ये सध्या कपिल देव आणि सईद किरमाणी यांची जोडी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी १८ जून १९८३ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध नव्या विकेटसाठी नाबाद १२६ धावांची भागीदारी केली होती. त्यांच्या भागीदारीचा विक्रम अँजेलो मॅथ्यूज आणि लसिथ मलिंगा यांनी २०१० मध्ये मेलबर्नला ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३२ धावांची भागीदारी करत तोडला होता.

कसोटीत ५००० धावा आणि ४०० विकेट्स

कपिल देव हे कसोटी क्रिकेटमध्ये ५००० पेक्षा अधिक धावा करणारे आणि ४०० हून अधिक विकेट्स घेणारे एकमेव अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त असा विक्रम आत्तापर्यंत कोणालाही करता आलेला नाही.

वनडेतील पहिले भारतीय शतकवीर

कपिल देव यांनी त्यांच्या वनडे कारकिर्दीत एकमेव शतकी खेळी केली आहे. पण ती शतकी खेळीही विक्रमी ठरली आहे. त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध केलेली १७५ धावांची नाबाद खेळी ही भारताकडून वनडेत साकारली गेलेली पहिली शतकी खेळी होती. त्यामुळे वनडेतील भारताचा पहिला शतकवीर खेळाडू बनण्याचा मानही कपिल देव यांना मिळालेला आहे.

वर्ल्ड कप जिंकणारे सर्वात युवा कर्णधार

कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने १९८३ साली वनडे वर्ल्ड कप जिंकला, हे सर्वांना माहित आहे. पण त्यावेळी त्यांचे वय अवघे २४ वर्षे १७० दिवस होते. त्यामुळे ते वर्ल्ड कप जिंकणारे सर्वात युवा कर्णधार आहेत.

आजही हा विक्रम त्यांच्या नावावर आहे. या विक्रमात त्यांच्यापाठोपाठ रिकी पाँटिंग आहे. त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने जेव्हा २००३ वर्ल्डकप जिंकलेला, तेव्हा त्याचे वय २८ वर्षे ९४ दिवस होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.