दिल्ली : एकीकडे संतोष देशमुख हत्याकांड आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडसह त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळील सहकारी असल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र, चौकशीत अद्याप कोणाचेच नाव नसल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी धनंजय मुंडेंना अभय दिले आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी अजितदादांचा चांगलांच समाचार घेतला आहे.
अजितदादांना कुठले पुरावे पाहिजेत? अजितदादा महाराष्ट्राचे नेते असते, तर बीडच्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळलं असते, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहेत. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
– Advertisement –
हेही वाचा : धनंजय मुंडेंचा पाय खोलात; निवडणुकीत भ्रष्ट मार्ग अवलंबल्याचा जवळच्या व्यक्तीचा आरोप
संजय राऊत म्हणाले, “बीड हत्याकांडप्रकरणात पुरावे समोर आले आहेत. अजितदादांना आता कुठले पुरावे पाहिजे आहेत? अजितदादा हतबल आहेत. ते नेते नाहीत. ते अपघाती नेते झाले आहेत. भाजपच्या ‘ईव्हीएम’च्या कृपेने त्यांचे आमदार निवडून आले आहेत. स्वत:च्या कर्तृत्त्वावर नाही. ते महाराष्ट्राचे नेते असते, तर जोपर्यंत न्यायालय निर्दोष मानत नाही, तोपर्यंत बीडच्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळलं असते.”
– Advertisement –
“बीडचे संपूर्ण पोलीस खाते बरखास्त करून तिथे नवीन नेमणुका व्हायला पाहिजे. हा संपूर्ण खटला बीडच्या बाहेर चालला पाहिजे. बीडचा तपास हा धुळफेक आहे. अजूनही आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खरे आरोपी आजही बाहेर आहेत,” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
“सुरेश धस बोलतात आणि वरून दट्ट्या आला की माघार घेतात. सुरेश धस तर हिंमतीनं उभे राहिले असतील, तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि बीड पॅटर्नचा कलंक धुवून काढण्यासाठी आमदार म्हणून नाहीतर एक नागरिक म्हणून आपली लढाई बेडरपणे त्यांनी चालू ठेवली पाहिजे. आम्ही सगळेजण सुरेश धस यांच्या पाठीशी उभे राहू,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : धनंजय मुंडेंनी जनाची नाही किमान मनाची लाज बाळगावी; अंजली दमानिया संतप्त