टीम इंडियाने तब्बल 10 वर्षांनंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका गमावली. ऑस्ट्रेलियाने मायदेशात झालेल्या 5 कसोटी सामन्यांची मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने या मालिका विजयासह सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक मारली. तर टीम इंडियाला मालिका पराभवासह दुहेरी झटका लागला. टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियनशीप फायनलच्या स्पर्धेतून बाहेर झाली. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
वूमन्स टीम इंडिया नववर्षात मायदेशात आयर्लंड विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. निवड समिताने 15 खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडियाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रेणूका सिंह ठाकुर या दोघींना विश्रांती देण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे. हरमनप्रीतच्या अनुपस्थितीत सांगलीकर स्मृती मानधना ही टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील मालिकेला 10 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 15 जानेवारीला सांगता होणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने हे एकाच मैदानात होणार आहेत. हे सामने निरंजन शाह स्टेडियम, राजकोट येथे होणार आहेत.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, पहिला सामना, शुक्रवार 10 जानेवारी, सकाळी 11 वाजता
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, दुसरा सामना, रविवार 12 जानेवारी, सकाळी 11 वाजता
टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड, तिसरा सामना, बुधवार 15 जानेवारी, सकाळी 11 वाजता
हरमनप्रीत कौर आणि रेणूका ठाकुर सिंहला विश्रांती
आयर्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: स्मृती मानधना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्स, उमा चेत्री (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, राघवी बिस्त, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवेर, तीतस साधू, सायमा ठाकोर आणि सायली सातघरे.