पंतप्रधान मोदींचा आम आदमी पक्षावर हल्लाबोल : विविध योजनांचे उद्घाटन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी एका कार्यक्रमानंतर रोहिणी येथे जनसमुदायाला संबोधित केले. जपानी पार्कमध्ये त्यांनी 35 मिनिटांचे भाषण करताना पुन्हा एकदा दिल्लीतील आप सरकारचे वर्णन ‘आप’त्ती (आपदा) असे केले. दिल्लीतील प्रदूषण, मद्य घोटाळा, शाळा घोटाळा, शीशमहल या मुद्यांवरून त्यांनी केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राजधानीत 12 हजार 200 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. दिल्ली-गाझियाबाद-मेरठ ‘नमो भारत’ कॉरिडॉरच्या साहिबाबाद ते न्यू अशोक नगर या भागाचेही त्यांनी उद्घाटन केले. गेल्या 15 दिवसातील त्यांचा दिल्लीतील हा तिसरा कार्यक्रम होता. येत्या आठवडाभरात दिल्लीतील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यात असल्याने त्यांच्याकडून उद्घाटन कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी दिल्लीतील ‘आप’दा सरकारकडे दूरदृष्टीही नाही आणि लोकांची काळजीही नाही. त्यांनी केवळ सत्तेत असताना आपत्ती ओढवून घेतल्या. त्यांचे कारनामे जनतेसमोर उघड होत असल्याने त्यांना माझा राग येऊ लागला, असे मोदी म्हणाले. आता येथील आम आदमी पक्षाचे सरकार हटवल्यानंतरच दिल्लीत सुशासन नांदेल, असेही त्यांनी सांगितले. येथील जनतेचे हित साधण्यासाठी भाजप पूर्ण क्षमतेने कार्य करणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.
दिल्लीतील मोठे प्रकल्प, संस्था आणि संघटनांची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. दिल्ली-एनसीआरमधील मेट्रो नेटवर्क गेल्या दशकात दुप्पट झाले आहे. जनकपुरी आणि कृष्णा पार्कसाठीही मेट्रो सुरू झाली आहे. रिठाळा, नरेला आणि कोंडली कॉरिडॉरचेही काम सुरू झाले आहे. नमो रेल प्रकल्प केंद्र सरकार बनवत आहे. केंद्र सरकार दिल्लीभोवती 6 लेन, 8 लेनचे रस्ते बनवत आहे. दिल्लीतील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी 55 हजार कोटींचे प्रकल्प सुरू असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
केजरीवालांचे प्रत्युत्तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहिणी येथील परिवर्तन रॅलीला संबोधित केल्यानंतर सायंकाळी 4 वाजता आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधानांचा ‘समाचार’ घेतला. पंतप्रधान रोज दिल्लीतील जनतेला शिव्या-शाप देत आहेत. हा दिल्लीतील जनतेचा अपमान आहे. भाजपच्या या अपमानाचे उत्तर दिल्लीतील जनता निवडणुकीत देईल. 38 मिनिटांपैकी 29 मिनिटे पंतप्रधान दिल्लीतील जनतेला शिव्या देत राहिले, असे केजरीवाल म्हणाले.