जयसिंगपूर : कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर आवक होणाऱ्या कोबीमुळे शिरोळ तालुक्यातील कोबीचा दर पडला आहे. एका कोबीचा उत्पादन खर्च पाच रुपये असताना दर चार रुपये मिळत असल्याने कोबी उत्पादक शेतकरी आतबट्ट्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी दर नसल्याने कोबी शेतातच गाडला आहे. तर अन्य कोबी उत्पादक शेतकरी कोबी शेतातून काढावा की गाडावा, या मानसिकतेत आहेत.
कोबी उत्पादक शेतकरी उत्पादनाला सुरुवात झाल्यापासून आर्थिक विवंचनेत आहेत. कोबीला चार पैसे चांगला भाव येईल, या आशेने भरमसाठ पैसे खर्च केले. मशागत, लावण, औषधे, पाणी, मजुरी, हमाली अशा अनेक टप्प्यांवर पैसे खर्च करूनदेखील शेतकऱ्यांच्या पदरात म्हणावा असा दर पडला नाही.
शिरोळ तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कोबी काढण्याचा दरदेखील परवडत नसल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने कोबी शेतातच गाडला आहे. कोबीच्या एक गड्ड्याचा उत्पादन खर्च सरासरी पाच रुपये येतो तर सध्या चार रुपये दर मिळत असल्याने एक रुपये तोट्यातील व्यवहार शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
कर्नाटक सीमाभागातून मोठ्या प्रमाणावर कोबी शिरोळ तालुक्याच्या बाजारात दाखल होत आहे. याच्याच परिणामी तालुक्यातील कोबीचा दर पडला आहे. कोबीच्या लागवडीपासूनच ढगाळ वातावरणाचा मोठा परिणाम पिकावर झाला होता. अशा स्थितीत पिके जगण्यासाठी खर्चिक औषध फवारणी करावी लागली होती. करपा, कीड, बुरशी रोगाचा मोठा धोका पिकाला होता. यातूनही शेतकऱ्यांनी कसेबसे पीक वाचवले. मात्र भावच नसल्याने कोबी काढावा की शेतात गाडावा अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे.
उत्पादन खर्च दूरच कोबी काढून मार्केटला नेण्याइतकाही दरही नसल्याने शेतकऱ्यांमध्ये ही द्विधा मनःस्थिती निर्माण झाली आहे. यातूनच अनेक शेतकऱ्यांनी कोबी गाडून टाकला आहे. कोबीला एकरी सुमारे दीड लाख रुपये उत्पादन खर्च आहे. जवळपास ४० हजार रोपे एकरात बसतात. एक रुपयाचे रोप, पाच रुपये उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने कोबी पीक परवडत नसल्याची भावना शेतकऱ्यांची आहे.
‘नैसर्गिक संकटातूनही कोबी जिवापाड जपला, वाढवला. मात्र दर नसल्याने कोबी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. शिरोळ तालुक्यात कर्नाटकातून दररोज मोठ्या प्रमाणावर कोबीची आवक होत आहे. याचाही परिणाम दरावर झाला आहे.
- दीपक मादनाईक, कोबी उत्पादक शेतकरी, जयसिंगपूर
पिकविणारा व घेणारा दोघांचेही नुकसानशेतकऱ्यांना उत्पादन खर्च प्रती कोबी ५ रुपये इतका येतो, पण हाच कोबी जेव्हा बाजारात येतो तेव्हा त्याची किंमत १५ ते २० रुपये होते. त्यामुळे मधली व्यवस्था यामध्ये मालामाल होत असल्याचे चित्र आहे. पिकविणारा शेतकरी आणि घेणारा ग्राहक दोघांचेही नुकसान होत आहे.