मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये कोलकाता आरजी कर रुग्णालय प्रकरणासारखीच घटना घडलीय. एका ज्युनियर डॉक्टरवर कॉलेज हॉस्टेलमध्ये बलात्कार कऱण्यात आलाय. पोलिसांनी सोमवारी याबाबत माहिती देताना सांगितलं की, ग्वाल्हेरच्या एका सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये हा प्रकार घडलाय. एका रिकाम्या हॉस्टेलमध्ये २५ वर्षीय ज्युनिअर डॉक्टरवर तिच्या सहकाऱ्यानेच बलात्कार केल्याचा आरोप आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितलं की, रविवारी गजराजा मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये असलेल्या हॉस्टेलमध्ये ही घटना घडली. पीडितेकडून ग्वाल्हेरमधील कम्पू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलिसांनी २५ वर्षीय आरोपीला अटक केलीय. शहर पोलीस अधीक्षक अशोक जादोन यांनी सांगितलं की, पीडिता एका परिक्षेसाठी गेली होती. ती कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत होती.
पीडितेसोबत शिकणारा आरोपी एक ज्युनिअर डॉक्टर आहे. आरोपीने पीडित तरुणीला जुन्या हॉस्टेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं होतं. तिथे कुणीही नसल्यानं निर्जन स्थळी आरोपीने दुष्कृत्य केलं. तरुणी जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा ज्युनिअर डॉक्टरने तिला धमकी दिली. तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक चौकशी केली जात आहे.
गेल्या वर्षी कोलकात्यात आरजी कर मेडिकल हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. पोस्टमार्टमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचंही समोर आलं होतं. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला कोलकाता पोलिसांनी केला होता. पण उच्च न्यायालयाने स्थानिक पोलिसांच्या कामावर चिंता व्यक्त करत सीबीआयकडे तपास सोपवला होता.