हार्दिक पांड्याला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बीसीसीआय असा निर्णय घेण्याच्या तयारीत
GH News January 07, 2025 07:14 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचं गणित चुकल्यानंतर टीम इंडिया आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीला लागली आहे. मागच्या पर्वात अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताचा धुव्वा उडवला होता. आता पुन्हा टीम इंडिया या स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र या स्पर्धेसाठी अजूनही संघ जाहीर केलेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध तीन सामन्याची टी20 मालिका आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेत टीम इंडियाच्या तयारीचा अंदाज घेतला जाईल. असं असताना टीम इंडियात कोणते खेळाडू असतील आणि काय जबाबदारी असेल हे ठरवलं जात आहे. असं सर्व चित्र असताना बीसीसीआय हार्दिक पांड्या धक्का देण्याच्या तयारीत आहे. रोहित शर्माचा फॉर्म नसला तरी चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्याच खांद्यावर धुरा असणार यात काही शंका नाही. पण त्याच्यासोबत उपकर्णधार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही मिडिया रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराहकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.

टीम इंडिया 2024 या वर्षात श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली. या वनडे मालिकेत टीम इंडियाला 2-0 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या मालिकेत कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर होती. तर हार्दिक पांड्याच्या गैरहजेरीत शुबमन गिलच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी होती. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत हार्दिक पांड्याची एन्ट्री होताच त्याला पुन्हा एकदा उपकर्णधारपदाची जबाबदारी मिळेल असं सांगण्यात येत होतं. मात्र तसं होणं आता कठीण दिसत आहे. शुबमन गिलकडून ही जबाबदारी काढून घेतली जाईल. तसेच हार्दिक पांड्यालाही फटका बसणार आहे.

टी20 क्रिकेटमध्येही हार्दिक पांड्या रोहित शर्मानंतर कर्णधार असेल अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. 2024 टी20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी निवृत्ती घेतली. पण टी20 संघाची धुरा हार्दिक पांड्या ऐवजी सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर टाकण्यात आली. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतही हार्दिक पांड्याला धक्का बसण्याची शक्यता आहे. बीसीसीआय 12 जानेवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा करणार आहे. त्यामुळे कोणाला संधी मिळते आणि कोणाला डावललं जातं हे स्पष्ट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.