नेपाळसह उत्तर भारत मंगळवारी पहाटे भूकंपाने हादरला. नेपाळला या भूकंपाचे मोठे धक्के बसले असून जिवीत आणि वित्त हानी झाल्याची माहिती समोर येतेय. सकाळी साडे सहाच्या सुमारास नेपाळला ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे नेपाळमध्ये ३६ जणांचा मृत्यू झालाय. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणांवर इमारती पडल्या असून अद्याप मृतांचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही.
नेपाळ तिबेट सीमेवर या भूकंपाने हाहाकार उडाला आहे. न्यूज एजन्सी एएफपीने दिलेल्या रिपोर्टनुसार, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. भूकंपामुळे तिबेटमध्ये प्रचंड नुकसान झालंय. भूकंपानंतर बचावकार्य वेगानं सुरू आहे. घरं पडल्यानं त्याच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
आसामपासून बिहार, उत्तर प्रदेश, दिल्लीसह उत्तर भारतातल्या अनेक राज्यात भूकंपाचे हादरे बसले. दिल्ली एनसीआर, मध्य प्रदेश, बिहारच्या पटना, मुजफ्फरपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळ पहाटे ६.३५ वाजता हादरलं, त्यानंतर उत्तर भारतातही भूकंपाचे हादरे बसले.
नेपाळमधील भूकंपाची तीव्रता इतकी होती की त्याचे धक्के उत्तर भारतातील काही भागात जाणवले. पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली हरियणासह इथर राज्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले. स्थानिक माध्यमांनी सांगितले की, नेपाळमध्ये भूकंपामुळे इमारतींचं नुकसान झालंय.