टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत 1-3 ने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर टीम इंडिया सध्या रिलॅक्स मोडवर आहे. टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा अपवाद वगळता बहुतांश क्रिकेटर हे बॉर्डर गावसकर ट्रॉफीत अपयशी ठरले. यामध्ये युवांसह अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी खेळाडूंनी या मालिकेत घोर निराशा केली. दोघांनाही त्यांच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तसेच शुबमन गिल यालाही काही खास करता आलं नाही.
आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या फलंदाजांच्या यादीत रोहित, विराटसह शुबमन गिल या त्रिकुटाला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा झटका लागला आहे. तिघांनाही कसोटी मालिकेत चांगली कामगिरी न केल्याचा फटका बसला आहे. शुबमन गिल आणि विराट कोहली या दोघांची प्रत्येकी 3-3 स्थानांनी घसरण झाली आहे. तर रोहित शर्माला 2 स्थानांचं नुकसान झालं आहे.
शुबमन गिल 20 व्या स्थानावरुन 23 व्या स्थानी फेकला गेला आहे. गिलच्या खात्यात 631 रेटिंग पॉइंट्स आहेत. विराट कोहली 24 वरुन 27 व्या स्थानी घसरला आहे. विराटचे रेटिंग पॉइंट्स 614 आहेत. तर रोहित शर्माचा टॉप 40 मध्येही समावेश नाही. रोहित 40 वरुन 42 व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. रोहितच्या नावावर 554 रेटिंग पॉइंट्स आहेत.
विराट, शुबमन आणि रोहितला निराशाजनक कामगिरीची फटका
दरम्यान फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये टीम इंडियाचे 2 फलंदाज आहेत. या दोघांमध्ये यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत या दोघांचा समावेश आहे. यशस्वीने त्याचं चौथं स्थान कायम राखलंय. तर पंतने पाचव्या कसोटीतील कामगिरीच्या जोरावर पहिल्या 10 फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलंय. यशस्वी 847 रेटिंग्ससह चौथ्या स्थानी कायम आहे. तर पंतने 3 स्थानांची झेप घेत नववं स्थान पटकावलं आहे. पंतने पाचव्या कसोटीतील पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 40 आणि 61 अशा एकूण 101 धावा केल्या. पंतला त्याचाच फायदा झाला. पंतच्या खात्यात 739 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.