- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
परीक्षेचा तणाव जबरदस्त असू शकतो. विशेषतः दहावी आणि बारावीच्या महत्त्वपूर्ण बोर्ड परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर अधिक असतो. विद्यार्थ्यांच्या तणावाचे कारण पालक आणि शिक्षकांकडून असलेल्या अपेक्षा हे असू शकते. तथापि, योग्य मानसिकता आणि धोरणांसह, विद्यार्थी त्यांच्या ‘तणावाचे व्यवस्थापन’ करण्यास आणि त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करण्यास नक्कीच शिकू शकतात.
भावना समजून स्वीकारा
परीक्षेची चिंता किंवा तणाव वाटणे स्वाभाविक आहे. ‘सकारात्मक’ व ‘नकारात्मक’ तणावांपैकी नकारात्मक तणाव कमी करणे गरजेचे असते. तुमच्या भावना ओळखा आणि त्या दाबण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी, आपला ताण व्यवस्थापित करण्यासाठी निरोगी मार्ग शोधण्यावर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल.
कसून तयारी करा
परीक्षेच्या दबावाचे मुख्य कारण म्हणजे तयारी पूर्ण न होण्याची भीती. अभ्यास पूर्ण होईल का? पेपर पूर्ण लिहिता येईल का? अभ्यास केलेल्या व्यतिरिक्त प्रश्न येतील का? असे प्रश्न मनात येऊ न देता कसून तयारी करण्यावर भर द्यावा. तुम्ही नियमितपणे अभ्यास करत असल्याची खात्री करा आणि तुमच्या नोट्स आणि पाठ्यपुस्तकांची सखोल उजळणी करा. संकल्पना लक्षात ठेवण्यापेक्षा समजून घेण्यावर भर द्या.
अभ्यास वेळापत्रक तयार करा
अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा आणि त्यास चिकटून राहा. अभ्यासातील विषयाचे छोटे छोटे तुकडे करून वास्तववादी उद्दिष्टे ठेवल्यास तणाव कमी होतो.
प्राथमिकता ठरवा
कठीण वाटणाऱ्या विषयाचा किंवा टॉपिक्सचा अभ्यास प्रथम करा. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि सोपे काम नंतरसाठी ठेवता येते व कमी वेळेत पूर्ण करता येते.
सकारात्मक मानसिकता विकसित करा
स्वतःला सकारात्मक उदाहरणांसह प्रोत्साहित केल्याने मानसिक दडपण कमी होते. स्वतःला आठवण करून द्या की आपण चांगली तयारी केलेली आहे. परीक्षेत चांगले प्रदर्शन करत असल्याची कल्पना करा.
शारीरिक आरोग्याची काळजी
कुठल्याही परीक्षेच्या काळात तुमच्या शारीरिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप, पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम तणाव व्यवस्थापनासाठी मदत करू शकते. व्यायामामुळे तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते आणि तुमचे लक्ष आणि एकाग्रता सुधारते. दीर्घ श्वसन, माईंडफुलनेस टेक्निक, पोमोडोरो टेक्निक यांचा फायदा होऊ शकतो.
आधार घ्या
आपले शिक्षक, पालक किंवा मित्रांकडून मार्गदर्शन घेण्यास घाबरू नका. तुमच्या चिंता आणि भीतीबद्दल त्यांच्याशी बोला आणि त्यांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. ते आपली ‘सपोर्ट सिस्टीम’ असल्याने त्यांच्या सल्ल्याची तणाव व्यवस्थापनात नक्कीच मदत होऊ शकते.
निष्कर्ष
परीक्षेचा तणाव अपरिहार्य आहे. तुमच्या भावना समजून घेऊन आणि त्यांचा स्वीकार करा, पूर्ण तयारी करून, सकारात्मक मानसिकता विकसित करून, तुमच्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. तुमचा तणाव व्यवस्थापित करू शकता आणि तुमच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करू शकता. लक्षात ठेवा, परीक्षा हा एक जीवनातील छोटासा प्रवास आहे आणि यापूर्वी अनेकांनी तो यशस्वीपणे पार केला आहे आणि आपणही आपल्या ‘तणावा’चे व्यवस्थापन शांत चित्ताने, लक्ष केंद्रित करून आणि आत्मविश्वासाने करूयात.