ध्येयाची सुस्पष्टता
esakal January 08, 2025 10:45 AM

- डी. एस. कुलकर्णी, जीवन कौशल्य प्रशिक्षक

Change your thoughts and you change your world.

मध्यंतरी ‘तुम्ही तुमचे शब्द बदला, तुमच्या अवती भोवतीचे जग बदलेल.’ असा आशय असलेली इंग्लिश भाषेतील शॉर्ट फिल्म बघितली. तुमचे शब्द म्हणजे तुमचा स्वसंवाद. तुमची स्वतःच व्यक्त केलेली स्वतःबद्दलची मते. त्या शॉटफिल्ममध्ये त्या शहरातील मोठ्या चौकात दृष्टिहीन व्यक्ती भीक मागत पथारीवर बसलेला दाखवलाय. शेजारी बोर्ड आहे, ‘मी दृष्टिहीन आहे आणि मी बघू शकत नाही!’ त्याच्या कटोऱ्यात बऱ्याच वेळापासून फारशी नाणी पडत नाहीत.

तिथून जात असलेली एक तरुणी तो बोर्ड वाचते आणि त्यावर नव्याने काहीतरी वेगळे लिहिते. आश्चर्य म्हणजे पाऊस पडावा तशी नाण्यांची बरसात त्या दृष्टिहीन व्यक्तीच्या डब्यात होते. ती तरुणी परत येताना दाखवली. दृष्टिहीन व्यक्ती तिला विचारते, ‘‘तू अशी काय जादू केलीस?’

‘मी तेच लिहिले, आशय तोच जुना परंतु मी वेगळे शब्द वापरले.’ ती तरुणी उत्तरली. कॅमेरा हळूहळू पॅन होतो, त्या पुठ्ठयावर लिहिलेले असते, ‘आजचा दिवस खूप छान आहे, परंतु मी तो बघू शकत नाही.’ मानवनिर्मित प्रत्येक समस्येला उत्तर असते.

हां, अगदीच त्सुनामी, वादळे, भूकंप अशा निसर्गनिर्मित समस्यांना तोडगा नसेलही. परंतु या समस्यांमुळे होणारी अपेक्षित हानी, कमी करण्यात मानव यशस्वी झालाय.

‘प्रारब्धात जे लिहिलेले आहे, ते घडणारच!’ वगैरे नकारात्मक विचारांचा खूप खोल प्रभावाखाली जाऊन एक प्रकारची निराशा येते. हाच स्वसंवाद बदलला, जरा वेगळ्या प्रेरणादायी पद्धतीने वाचला तर निदान मनावरचे निराशेचे सावट, मळभ दूर होण्यास नक्कीच मदत होईल. हुरूप वाढेल. प्रयत्नांती हे सहज शक्य आहे. त्यात सातत्य हवे.

‘प्रयत्ने वाळूचे कण...’ वगैरे अनेकदा रगडून झालेले आहेत. परंतु असे नुसतेच म्हणायचे. प्रत्यक्षात प्रयत्न शून्य. मग यश तरी कसे काय प्राप्त होणार?

‘मला हे जमणारच नाही, हे माझे कामच नाही, सध्या शनीची साडेसाती सुरू आहे, माझे नशीबच फुटके!’ अशा अनेक नकारात्मक भावना मनात फेर घालत असतात. त्रासदायक, खडतर प्रसंग असतात ही. तथापि उसंत घेतली, विचारमंथन केले, योग्य आणि खात्रीच्या सल्लागारांकडून सल्ला घेतला तर बाका प्रसंगातून मार्ग निघू शकतो.

अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आलेली असतानाही, अत्यंत संयमाने, स्वबुद्धीचा वापर करून, आत्मविश्वासाने मार्ग काढत यश मिळवलेले एक उद्योगपती कुटुंब माझे मित्र आहे. अत्यंत सजगतेने आपल्या आजूबाजूला बघितले तर अशा अनेक घटना, आपण पाहू शकतो.

नजीकच्या आणि जरा दूरच्या भविष्यात काय-काय बदल घडू शकतात? त्यासाठी स्वतःमध्ये कोणती कौशल्ये आत्मसात करावयास हवीत? अशा प्रश्नांचा आढावा घेऊन संभाव्य बदलांना खुल्या दिलाने सामोरे जायला हवे. यालाच म्हणतात ध्येय सुस्पष्टता, चेंज मॅनेजमेंट, ते का व कसे? बघूया पुढील भागात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.