इंटरपोलशी देशातील तपास यंत्रणांना जोडणारे पोर्टल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुन्ह्यांचा तपास करत असलेल्या भारतीय यंत्रणांचे काम काही प्रमाणात सोपे होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी ‘भारतपोल’ पोर्टल लाँच केला आहे. इंटरपोलच्या धर्तीवर विकसित भारतपोलच्या मदतीने अधिकारी आता एका क्लिकवर वाँटेड गुन्हेगारांची माहिती मिळवू शकतील. पोर्टलचा वापर सीबीआयच्या अधिकृत वेबसाइटद्वारे केला जाऊ शकेल.
भारतपोल आमच्या देशाच्या आंतरराष्ट्रीय तपासाला एका नव्या युगात नेणार आहे. पूर्वी सीबीआय ही एकमात्र यंत्रणा इंटरपोलसोबत काम करण्यासाठी अधिकृत होती, परंतु आता भारतपोलद्वारे प्रत्येक भारतीय यंत्रणा आणि सर्व राज्यांचे पोलीस सहजपणे इंटरपोलशी जोडले जातील, असे उद्गार गृहमंत्री शहा यांनी काढले आहेत.
केंद्रीय यंत्रणांसोबत राज्य अन् केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना गुन्हेगारी प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष वेळेत आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवून देण्यास मदत करणारे हे पोर्टल असणार आहे. भारतपोल पोर्टलद्वारे देशाच्या यंत्रणा त्वरित माहिती मिळवू शकतील असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
या पोर्टलद्वारे राज्यांचे पोलीस देखील विदेशात पसार झालेले गुन्हेगार आणि त्यांच्या गुन्ह्यांचा तपशील इंटरपोलकडून मागवू शकतील. भारतपोल पोर्टलच्या मदतीने सीबीआय केंद्र आणि राज्यस्तरावर इंटरपोल अधिकाऱ्याशी थेट जोडले जाऊ शकेल. पोर्टलवरच माहिती पुरविली जाईल, ईमेल-फॅक्सची गरज भासणार नाही. सायबर गुन्हे, वित्तीय गुन्हे, ऑनलाईन कट्टरवाद, अमली पदार्थ तस्करी, मानवी तस्करी यासारख्या गुन्ह्यांवर आता देशाच्या सर्व यंत्रणा एकत्रितपणे गुन्हेगारांना ट्रॅक करू शकतील.
भारतपोल पोर्टल इंटरपोलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय साहाय्यासाठी सर्व विनंतीविषयक कारवाईला सुलभ करणार आहे, ज्यात रेड नोटीस अणि अन्य कलर कोडेड इंटरपोल नोटीस जारी करणे सामील आहे. भारतात इंटरपोलसाठी नॅशनल सेंट्रल ब्युरोच्या स्वरुपात सीबीआय, कायदा-अंमलबजावणी यंत्रणांसमवेत देशभराच्या विविध यंत्रणांसोबत मिळून गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्यात मदत करत असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले.
केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या स्तरावर हे समन्वय इंटरपोल लाएसन ऑफिसरच्या (आयएलओज) माध्यमातून केले जाते, जे स्वत:च्या संघटनांमध्ये पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त आणि शाखा प्रमुखांच्या स्तरावर युनिट ऑफिसर्सशी (युओज) जोडलेले असतात. वर्तमान सीबीआय, आयएलओज आणि युओजदरम्यान संपर्क मुख्यत्वे पत्र, ईमेल आणि फॅक्सवर निर्भर असतो.
इंटरपोलच्या माध्यमातून सीबीआय भारतात गुन्हे किंवा गुन्हेगारांच्या तपासात साहाय्यासाठी इंटरपोलच्या अन्य सदस्य देशांच्या समान यंत्रणांकडून आवश्यक माहिती मागू शकते तसेच अन्य देशांच्या सहकार्यासाठी गुन्हेगारी डाटा आणि गोपनीय माहिती पुरवू शकते.
भारतपोल पोर्टल आवश्यक आहे का?
सायबर गुन्हे, ऑनलाईन दहशतवाद, संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्करी समवेत आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. या प्रकरणांच्या तपासादरम्यान अनेकदा अन्य देशांची मदत घ्यावी लागते. तसेच देशात गुन्हे करून विदेशात पळालेल्या गुन्हेगारांना परत आणून शिक्षा मिळवून देणे देखील सुरक्षा यंत्रणांसाठी आव्हान ठरले आहे. याकरता भारतीय यंत्रणा इंटरपोल समवेत अन्य विदेशी सुरक्षा यंत्रणांची मदत घेतात. आता भारतपोलद्वारे इंटरपोल आणि अन्य देशांकडून त्वरित गुन्हेगारांचा डाटा मिळविता येणार आहे.