Suresh Dhas : 2 कोटीची डिफेंडर गाडी, पोलिसाच्या घरात दीड कोटी, सुरेश धस यांचे आकावर गंभीर आरोप
GH News January 08, 2025 01:13 PM

बीड आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी आज देवगिरी बंगल्यावर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुरेश धस यांनी मीडियाशी संवाद साधला. सुरेश धस अचानक अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. वाल्मिक कराडवर त्यांनी वसुलीचा आरोप केला. “यांचे वेगवेगळे धंदे आहेत. वसुलीच्या या जेवढ्या गँग्स आहेत, त्यांना मोक्का लावला पाहिजे, नाहीतर, जे तिहार जेलमध्ये होतेय ते भविष्यात अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येतय तसा काहीसा प्रकार या गँग्सकडून होऊ शकतो. हे मी पूर्ण जबाबदारीने बोलतोय” असं सुरेश धस यांनी म्हटलं.

“ज्या बँका, पतपेढ्या बुडाल्या त्यामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग आहे. पोलिसांनी तपास केला, त्यात खाडे नावाचा अधिकारी आहे, त्याच्या घरी दीड कोटी रुपये सापडले. वाल्मिक कराडने एका स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेला दमबाजी करुन त्यांच्याकडून 2 कोटी रुपयांची डिफेंडर गाडी घेतली” असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला. “असे पैसे देण्या-घेण्यात, पैसे बुडवण्याच्या प्रकरणात लोकांसोबत राहण्याऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघेही पैसे बुडवणाऱ्याच्या बाजूने उभे राहिले. वाल्मिक कराड हा चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार आहे” असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.

प्रॉपर्टीची आकडेवारी जाहीर करणार

“डीफेंडर गाडी आणि त्या पोलिसाला वाचवायला वाल्मिक कराड होता. उद्या किंवा परवा जिथे कुठे मोर्चा असेल, तिथे यांच्या प्रॉपर्टीची आकडेवारी जाहीर करेन” असं सुरेश धस यांनी सांगितलं. बापू आंधळे हत्या प्रकरणावरही सुरेश धस बोलले. “बबन गीते या व्यक्तीचा त्या खुनाशी काहीही संबंध नाही. नाव टाकायच म्हणून त्याच नाव टाकलं. कारण विधानसभेला तो उमेदवार होतो की काय त्यासाठी अशा पद्धतीने काटा काढला” असं सुरेश धस म्हणाले.

वरच्या आकांचा फुल सपोर्ट

“मी धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेचे आमदार प्रकाश सोळंकी यांनी तशी मागणी केली आहे. मी आका आणि आकांचे आका म्हणत होतो. पण मी आता स्पष्टपणे बोलतोय. मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांचा राजीनामा घेणं कोणाच्या हातात आहे?” असा उलटा सवाल सुरेश धस यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.