उदगीर - मराठा नेते मनोज जरांगे पाटील व सामाजीक कार्यकत्या अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाच्या नेत्यांना व समाजाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. ८) रोजी अडीच वाजणाच्या सुमारास एन.सी.आर.ची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ४ जानेवारी रोजी परभणी येथे जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय हेतूने जातीय तेढ निर्माण करणारे व्यक्तव्य केल्याने वंजारी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, समाजामध्ये अशा वक्तव्यामुळे तनावपूर्वक वातावरण निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला आहे.
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांची जी हत्या झाली ती अतिशय वाईट घटना आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्याना कठोर शिक्षा व्हावी. परंतु या घटनेच्या आडून मनोज जरांगे पाटील व अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाबद्दल तसेच वंजारी समाजाचे मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे, समाजातील अधिकारी व कर्मचारी यांना जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत आहेत, अशी तक्रार गोविंद नरहरी घुगे लोणी (ता. उदगीर) व सकल ओबीसी समाज यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघा विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यातएनसीआरची नोंद करण्यात आली आहे.